Site icon

Nashik Crime : मौजमजेसाठी मोबाइल ओरबाडणारे गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पादचारी नागरिकांकडील महागडे मोबाइल हिसकावून पळ काढणाऱ्या चौघांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून २२ मोबाईल जप्त केले असून जबरी चोरीचे सात गुन्हे उघडकीस आणले आहेत. मौजमजा करण्यासाठी चौघांनी मोबाइल ओरबाडण्यास सुरुवात केल्याचे पोलिस तपासात समोर आले.

चेतन निंबा परदेशी (रा. शांतीनगर, सिडको), शशिकांत सुरेश अंभोरे (रा. पौर्णिमा बसस्टॉपजवळ), विजय सुरेंद्र श्रीवास्तव (रा. जुने सिडको), निखील अर्जुन विंचू (रा. पाथर्डी फाटा) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. पाटील लेनजवळील परिसरातून ४ फेब्रूवारीला दुचाकीस्वार तिघा चोरट्यांनी एकाकडील मोबाइल हिसकावून नेला होता. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तपास सुरु केला.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, पोलिस नाईक महेश साळुंके यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चेतन, शशिकांत व विजय या तीन संशयितांची ओळख पटवली. त्यानंतर उपनिरीक्षक विष्णु उगले, सहायक पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, हवालदार प्रविण वाघमारे, प्रविण म्हसदे, शरद सोनवणे, नाझिमखान पठाण, संदिप भांड, प्रशांत मरकड, विशाल देवरे, मुक्तार शेख यांच्या पथकाने तिघांनाही पकडले. तिघांकडून पोलिसांनी २२ मोबाइल, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण चार लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच आडगाव येथील गुन्ह्यात निखील विंचू यास पकडून त्याचा ताबा आडगाव पोलिसांना दिला. पोलिस तपासात चौघेही महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्याचे समोर आले. मौजमजा करण्यासाठी कमी वेळेत जास्त पैसे कमवण्याच्या हेतूने चौघांनी जबरी चोरी करण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट झाले आहे. या संशयितांकडून इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

The post Nashik Crime : मौजमजेसाठी मोबाइल ओरबाडणारे गजाआड appeared first on पुढारी.

Exit mobile version