Site icon

Nashik Crime : राग अनावर ; क्षणात जीवावर घाला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात गेल्या काही दिवसांत राग अनावर झाल्याने गंभीर गुन्हे घडले आहेत. त्यामुळे मनावर, रागावर नियंत्रण न ठेवल्याने काहींच्या हातून गंभीर गुन्हे झाले असून त्यात दोघांचा जीव गेला आहे. काहींना शारीरीक दुखापती व आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे क्षणीक रागावर नियंत्रण नसल्याने अनेकांना नुकसान, मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातून सामाजिक, कौटुंबिक व्यवस्थेलाही नुकसान होताना दिसते.

सातपूर येथे सोशल मीडियावरील पोस्टवर हसला म्हणून झालेल्या वादातून एकाचा खुन झाल्याचा प्रकार बुधवारी (दि.११) उघडकीस आला. तर गावाकडील मुलासोबत फोनवर वारंवार मुलगी बोलते यामुळे संतप्त होत अंबड येथील पित्याने मुलीचा खून केला होता. यासह वाहनाचा कट लागला म्हणून होणाऱ्या हाणामाऱ्या, वाहनांची तोडफोड नित्याची झाली आहे. तर माझ्याकडे का बघतो या कारणांवरूनही मारहाण कायम होत असते. त्यामुळे क्षणात विचारपूर्वक न केलेल्या कृतीतून गंभीर गुन्हे घडताना दिसत आहे. रागावर नियंत्रण न ठेवल्याने हिंसा वाढत असून त्याचा फटका प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या नागरिकांना होत आहे. राग मनात ठेवल्याने वैरभावना वाढत असून हिंसक वृत्तीसह खतपाणी मिळत आहे. त्यामुळे क्षणात गंभीर घटना घडत असून त्यानंतर संबंधित व्यक्तींना मनस्ताप सहन करावा लागत आहे. गंभीर गुन्हे घडल्याने ते सर्वांसमोर येते तर काही प्रकरणांची वाच्यता होत नसल्याने त्याचे गांभीर्य सर्वांपर्यंत पोहचत नसल्याचेही चित्र आहे. रागाच्या भरात अनेकांनी आयुष्याचा शेवट केल्याचेही उदाहरणे आहेत. जवळील व्यक्तींसोबत कमी झालेला संवाद, कमी झालेली विश्वासार्हता, रागावर नियंत्रण न ठेवता येणे यामुळे निर्णय घेण्यात चुका होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे.

भावनांचे व्यवस्थापन कमी होत असून रागावर नियंत्रण ठेवण्याचे प्रमाण कमी होतांना दिसते. प्रतिसादापेक्षा प्रतिक्रिया देण्याची वृत्ती वाढत आहे. प्रतिसाद आपण विचारपुर्वक करत असतो. मात्र प्रतिक्रिया देताना विचार केला जात नसल्याने नुकसान होत आहे. त्यातून गंभीर घटना घडतात.

– डॉ. मृणाल भारद्वाज, मानसोपचार तज्ज्ञ

हेही वाचा :

The post Nashik Crime : राग अनावर ; क्षणात जीवावर घाला appeared first on पुढारी.

Exit mobile version