Site icon

Nashik Crime : विद्यार्थ्यावरील चाकू हल्ल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर

नाशिक  (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

उत्तमनगर परिसरात टोळक्याने भररस्त्यात सिनेस्टाइल पाठलाग करून विद्यार्थ्यावर चाकूहल्ला केल्याच्या घटनेनंतर ख‌डबडून जागे झालेल्या पोलिस प्रशासनाने शाळा-महाविद्यालय परिसरात पोलिस गस्त वाढविली आहे. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी पोलिस पथक तैनात करण्यात आल्याने टवाळखोरांची पळापळ झाल्याचे पहिल्याच दिवशी पहायला मिळाले.

अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदन बगाडे यांनी परिसरातील शाळा-महाविद्यालय परिसरांत पोलिसांची गस्त वाढवून टवाळखोरांचा समाचार घेण्यास सुरुवात केल्याने टवाळखोरांचे धाबे दणाणले आहेत. सोमवारी दुपारच्या सुमारास उत्तमनगर भागात महाविद्यालयीन विद्यार्थ्याला चार ते पाच अज्ञात टवाळखोरांनी मारहाण करीत चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. शाळा-महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारांवर अनेकदा वाहतूक कोंडी, युवतींची छेडछाड तसेच टवाळखोरांचा वावर वाढल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या टवाळखोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती.

याच पार्श्वभूमीवर अंबड पोलिस खऱ्या अर्थाने ॲक्शन मोडवर आले आहेत. मंगळवारी सकाळी तसेच सायंकाळच्या सुमारास शाळा व महाविद्यालय सुटताना या प्रवेशद्वारावर मोकाट फिरणाऱ्या टवाळखोरांचा बंदोबस्त व्हावा, या अनुषंगाने ठिकठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवली आहे. टवाळखोरांना जाब विचारून त्यांना चांगलाच चोप देण्यात आला. मंगळवारी दिवसभर पोलिसांची गस्त सुरू असल्याने ही गस्त कायमस्वरूपी ठेवावी व मोकाट टवाळखोरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

हेही वाचा :

The post Nashik Crime : विद्यार्थ्यावरील चाकू हल्ल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर appeared first on पुढारी.

Exit mobile version