Nashik Crime : शेअर्स ब्रोकरला लुटले ; तीस लाखांना घातला गंडा

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा
शेअर्स मार्केटमध्ये टे्रडिंग करणार्‍या ब्रोकरचा अपहरण करण्याचा प्रयत्न फसला असून, ब्रोकरला चोरट्यांनी दोन मोबाइलसह 30 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील वाहन सातपूर पोलिसांनी हस्तगत केले आहे. तर फरार संशयितांचा तपास पोलिस करीत आहेत.

पोलिसांनी दिलेेल्या माहितीनुसार, शेअर्स मार्केटमध्ये ट्रेडिंगचा व्यवसाय करणारे नरेंद्र बाळू पवार (रा. खुटवडनगर) यांच्याशी अज्ञाताने संपर्क करून शेअर्स मार्केटसंबंधित काम असल्याचे सांगून, बुधवारी (दि.29) रात्री 8.30 वाजता आयटीआय सिग्नल येथे बोलावून घेतले. त्यानंतर सकाळ सर्कल येथे भेट घेऊन पवार यांना बळजबरीने चारचाकी वाहनात बसवून चाकूचा धाक दाखवत पाच कोटी रुपयांची मागणी केली होती. तसेच खिशातील दोन्ही मोबाइल काढून घेतले. अचानक आलेल्या या प्रसंगामुळे पवार यांनी औरंगाबाद येथील मित्राकडून पैसे घेऊन देतो, असे सांगितले. त्यानंतर पवार यांच्या सांगण्यावरून विजय खरात या त्यांच्या मित्राने औरंगाबाद सिडको बसस्थानक येथे संशयिताच्या औरंगाबाद येथील साथीदाराला 20 लाख रुपये दिले. ते घेतल्यानंतरही अपहरणकर्त्यांनी त्यांच्याकडून आणखी पैशांची मागणी केली.

दरम्यान, संशयितांनी एक तासात घोटी-त्र्यंबक असा प्रवास करत पुन्हा पवार यांना सकाळ सर्कल येथे आणून सोडले. मात्र, चारचाकी वाहनातून उतरून पवार यांच्या ऑडी वाहनात बसवून दोन्ही बाजूने संशयित बसले. पवार यांना खुटवडनगर येथील मनोज पवार नामक मित्राच्या घराजवळ नेले. मात्र, मनोज पवार घरी नसल्याने संशयितांनी पैशांसाठी तगादा लावत धमकावले. त्यानंतर पवार यांनी पैशासाठी मित्राकडून पैसे घेण्यासाठी जाऊ, असे म्हणत स्वतःच्याच घराकडे नेत संशयितांना घराबाहेर थांबवले. त्यानंतर रात्री12 च्या सुमारास हुशारीने स्वतःची सुटका करून घेतली. दरम्यान, या गुन्ह्यात 30 हजार रुपये किमतीचे दोन फोन, 10 लाख रुपयांची ऑडी तसेच 20 लाख रुपयांची रोख रक्कम असा एकूण 30 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज लुटल्याचा तसेच अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातपूर पोलिसांनी तपास करत औरंगाबाद येथून ऑडी वाहन हस्तगत केले आहे. तर फरार संशयित आठही आरोपींच्या तपासासाठी औरंगाबाद येथे पथके रवाना करण्यात आली आहेत.

हेही वाचा :

The post Nashik Crime : शेअर्स ब्रोकरला लुटले ; तीस लाखांना घातला गंडा appeared first on पुढारी.