Site icon

Nashik Crime : शेतात काम करीत होती महिला, दागिण्यांसाठी गळा आवळून संपवलं

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा

नाशिकमधील येवला तालुक्यातील मुखेड येथे शेतात काम करीत असलेल्या महिलेशी झटापट करून, उपरण्याने तिचा गळा आवळून जिवे ठार मारत सोन्याची पोत आणि कर्णफुले जबरीने चोरून नेल्याची घटना घडली होती. या खूनातील संशयितास ग्रामीण पोलिसांची शिताफीने अटक केली.

मुखेड शिवारात नवीन कॅनॉललगत असलेल्या शेतात फिर्यादी वैभव बाळासाहेब आहेर यांची आई शेतीचे काम करीत असताना अनोळखी असलेल्या आरोपीने तिला ऊसाच्या शेतात ओढून, उपरण्याने तिचा गळा आवळून व डोके जमिनीवर आपटून खून केला. तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेल्याची घटना घडली होती. तालुका पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खुनाच्या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन व सूचना केल्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, तालुका पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांनी घटनास्थळास भेट देऊन घडलेल्या परिस्थितीची बारकाईने पाहणी केली. घटनास्थळावर फॉरेन्सिक टीम व श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते.

पोलिस पथकांनी तपास सुरू करून घटनास्थळी मिळालेले भौतिक पुरावे आणि प्रत्यक्षदर्शीने बघितलेल्या आरोपीचे वर्णन केल्याप्रमाणे पोलिसांनी पुरावे शोधत नीलेश भगवान गिते (३४, रा. महालखेडा, ता. येवला) याला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता, त्याने गुन्ह्याची कुबुली दिली. ही कारवाई पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक रवींद्र वानखेडे, नवनाथ सानप, जालिंदर खराटे, विश्वनाथ काकड, नवनाथ वाघमोडे, उदय पाठक, प्रशांत पाटील, नंदू काळे, पोना सागर काकड, प्रीतम लोखंडे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, बापू खांडेकर यांच्या पथकाने केली. दरम्यान या खुनाचा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी तपास पथकास २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करून अभिनंदन केले आहे.

हेही वाचा : 

The post Nashik Crime : शेतात काम करीत होती महिला, दागिण्यांसाठी गळा आवळून संपवलं appeared first on पुढारी.

Exit mobile version