Nashik Crime : शेतीच्या वादातून पुतण्यानेच केला काकाचा खून

खून,www.pudhari.news

मालेगाव : (जि. नाशिक)

पिंपळकोठे – ताहाराबाद रस्त्यावर शुक्रवारी (दि.11) शिक्षकाचा अपघाती मृत्यू नव्हे तो नियोजनबद्ध खून असल्याची उकल करण्यात ताहाराबाद पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे, पुतण्यानेच काकाचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. संशयित आरोपी सुजित सुनिल भामरे याला अटक झाली आहे.

तेलदरा वस्ती (ता. बागलाण) येथील प्राथमिक शाळेत नियुक्त शिक्षक रमेश शिवराम भामरे (57) हे शुक्रवारी (दि.11) कठगडमार्गे ताहाराबादकडे दुचाकी येत असताना अपघात झाला होता. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा मुलगा चेतन याने जायखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवताना चुलतभाऊ सुजित भामरे याच्यावर संशय व्यक्त केला होता. त्याप्रमाणे सहायक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलिस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ यांच्यासह पोलिस कर्मचार्‍यांचे पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास केला. तांत्रिक कौशल्य आणि सुजितच्या हालचालींची माहिती घेण्यात आली. त्याला ताब्यात घेण्यात येऊन उलटतपासणी करण्यात आली. त्यात सुजितने गुन्ह्याची कबुली दिली.

रमेश भामरे यांची पिंपळकोठे गाव शिवारात वडिलोपार्जित शेतजमिन आहे. तिच्या वाटणीहिश्शावरुन भाऊ सुनिल शिवराम भामरे यांच्यात वाद होते. त्यातूनच पुतण्या सुजित याने काका रमेश यांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती. घटनेच्या दिवशी सुजित दुपारी 3 वाजेपासून पाळतीवर होता. 4 वाजेच्या सुमारास रमेश हे पिंपळकोठे येथून ताहाराबादच्या दिशेने निघाल्याची संधी त्याने साधली. ताहाराबादजवळील शशिकांत पगारे यांच्या शेताजवळ सुजितने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टरने रमेश यांच्या दुचाकीला ठोस दिली. त्यामुळे ते दुचाकीसह पडले. सुजितने काही अंतरावर ट्रॅक्टर थांबवून रमेश यांच्या स्थितीची खात्री केली. त्यांच्यात प्राण असल्याचे पाहून त्याने त्यांच्या डोक्यात पुन्हा दुखापत करित जीवे मारले. संशयित सुजितवर खूनाचा गुन्हा नोंदविण्यात येऊन त्यावर अटकेची कारवाई झाली असून, सोमवारी (दि.14 सटाणा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

The post Nashik Crime : शेतीच्या वादातून पुतण्यानेच केला काकाचा खून appeared first on पुढारी.