
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सावकारी आणि कर्जवसुलीच्या घटनांमुळे नाशिक शहर हादरले असून, एकापाठोपाठ एक संतापजनक घटना उघडकीस येत आहेत. पाथर्डी फाटा येथील घटनेला २४ तास उलटत नाही तोच पंचवटीतही आणखी एक संतपाजनक घटना घडली आहे. दहा टक्के व्याजाने पैसे दिल्यानंतर त्यावर चक्रवाढ दराने व्याज आकारून खासगी सावकाराने कर्जदाराचे अपहरण करीत बळजबरीने पैसे घेतले. त्याचप्रमाणे कर्जदाराच्या घरात शिरून त्याच्या पत्नीचा विनयभंग केल्याने याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित सावकारास अटक केली आहे. चेतन प्रकाश बाेरकर (३२, रा. तांबोळी गल्ली, हिरावाडी) असे या खासगी सावकाराचे नाव आहे.
तीन दिवसांपूर्वी पाथर्डी फाटा परिसरात कर्जवसुलीच्या धमक्यांनी भयभीत झालेल्या गौरव व नेहा जगताप या तरुण दाम्पत्याने आत्महत्या केली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असतानाच पंचवटीत खासगी सावकाराने घरात शिरून विनयभंग केल्याचा प्रकार समाेर आला. त्यामुळे या घटनांनी खासगी सावकारीचे वास्तव उघडकीस आले आहे. संशयित सावकार चेतन याने दहा टक्के व्याजाने ज्याला पैसे दिले, त्याच्या पत्नीने पंचवटी पोलिसांत फिर्याद दिली आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या पतीने फेब्रुवारी २०२० मध्ये संशयित चेतनकडून चार लाख ५० हजार रुपये दहा टक्के दराने घेतले होते. ते पैसे न दिल्याने चेतनने आपल्या पतीस त्याच्या कारमध्ये बळजबरीने बसवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पतीने ऑनलाइन पद्धतीने चेतनला ५० हजार रुपये दिले व त्यानंतर अडीच लाख रुपये दिले. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी आपला पती घरी नसताना चेतन घरी आला व विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिस ठाण्यात सावकाराविरोधात विनयभंग, अपहरण, महाराष्ट्र सावकार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन चेतनला मंगळवारी (दि.२०) रात्री अटक करण्यात आली.
सहापटीने वसुली
पीडितेच्या फिर्यादीनुसार, तिच्या पतीने चेतनकडून दहा टक्के व्याजाने फेब्रुवारी २०२० मध्ये चार लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले. मात्र, वसुली करताना चेतनने व्याजासह २६ लाख ९८ हजार रुपयांची मागणी केली. त्यापैकी तीन लाख रुपये पतीने चेतनला दिले होते. त्यामुळे संशयित सावकाराने मुद्दलीच्या सहापटीने वसुलीचा तगादा लावला होता.
हेही वाचा :
- नगर : अत्याचार प्रकरणी नराधमास सक्तमजुरी
- राहुरी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला सेनेची धार, आंदोलकांच्या मुळा धरणात उड्या
- Chhagan Bhujbal : भुजबळांनी मुंबईला कोंबडीची उपमा दिल्याने प्रचंड गदारोळ
The post Nashik Crime : सावकाराकडून महिलेचा विनयभंग, पतीचे अपहरण appeared first on पुढारी.