Nashik Crime : सिनेस्टाइल पाठलाग करून दोन कोटींचा गुटखा केला जप्त

दोन कोटींचा गुटखा जप्त,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मिळालेल्या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी इगतपुरी तालुक्यातील वाडिवऱ्हे येथील गुरुनानक ढाबा परिसरात तब्बल दोन कोटींचा गुटखा जप्त केला. यावेळी संशयित आरोपीने घटनास्थळावरून पळ काढल्याने तब्बल एक किलोमीटर सिनेस्टाइल पाठलाग करून अधिकाऱ्यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, वाडिवऱ्हे येथील गुरुनानक ढाबा परिसरात मोठ्या प्रमाणात गुटखा आणला जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी या परिसरात सापळा रचून दोन मोठ्या कंटेनरची झाडाझडती घेतली. त्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा आढळून आला. दरम्यान, यातील एका वाहनातून संशयित आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी तब्बल एक किलोमीटर फिल्मी स्टाइल पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या. यावेळी आरजे ०६ जीबी ५२०३ या क्रमांकाच्या कंटेनरमधून एसएचके प्रीमियम या गुटख्याचा तब्बल १ कोटी ५० लाख ५४ हजार किमतीचा, तर आरजे ०९ जीबी ०४७२ या क्रमांकाच्या दुसऱ्या कंटेनरमधून एसएचके प्रीमियम सफर व ४के (स्टार) या ब्रॅण्डचा ४५ लाख ३३ हजार किमतीचा असा एकूण १ कोटी ९५ लाख ८७ हजार इतक्या किमतीचा साठा जप्त करण्यात आला. तसेच अंदाजे ३० लाख किमतीचे दोन्ही कंटेनर ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने सर्व जप्त मुद्देमाल हा पुढील कारवाईसाठी वाडिवऱ्हे पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. तसेच वाडिवऱ्हे पोलिस ठाण्यात अन्न सुरक्षा मानके कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री संजय राठोड, आयुक्त अभिमन्यू काळे, सहआयुक्त गणेश परळीकर, सहायक आयुक्त उदय लोहकरे, मनीष सानप यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल कासार, अमित रासकर यांनी केली आहे.

हेही वाचा :

The post Nashik Crime : सिनेस्टाइल पाठलाग करून दोन कोटींचा गुटखा केला जप्त appeared first on पुढारी.