Nashik Crime : सोयाबीन चोरणाऱ्या दोघांना बेड्या

Theft

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

कांद्याच्या चाळीत शेतकऱ्याने काढून ठेवलेला ५ क्विंटल सोयाबीन दोघांनी दुचाकीद्वारे चोरून नेला. याबाबत चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल होताच १० ते १२ तासांच्या आत चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात चांदवड पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांचे चांदवडकरांनी विशेष कौतुक केले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी किसन भाऊसाहेब ठाकरे (६०) यांच्या शेत गट नंबर ४९८ मधील कांद्याच्या चाळीत त्यांनी ५ क्विंटल सोयाबीन काढून ठेवला होता. हा सोयाबीन अज्ञातांनी रात्रीच्या सुमारास दुचाकीद्वारे चोरून नेला. याबाबत ठाकरे यांनी त्वरित चांदवड पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दीपक मारुती ठाकरे (३१) व सागर वाळूबा शिंदे (३२, दोघे रा. सोनीसांगवी) यांना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली. संशयितांनी २५ हजार रुपये किमतीचा ५ क्विंटल सोयाबीन चोरून नेल्याची कबुली दिली. त्यानुसार दोघा संशयितांना चांदवड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक राजू गायकवाड पुढील तपास करीत आहे. 

हेही वाचा :

The post Nashik Crime : सोयाबीन चोरणाऱ्या दोघांना बेड्या appeared first on पुढारी.