Nashik Crime : करवतीने हात कापून बालकाची हत्या

बालकाची हत्या,www.pudhari.news

नाशिक (मनमाड) पुढारी वृत्तसेवा

शहरातील नऊ वर्षाच्या निष्पाप बालकाची करवतीने हात कापून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मनमाडमध्ये उघडकीस आला. मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटनेने शहर हादरले आहे. हे बालक बुधवारपासून बेपत्ता होते. पोलिसांनी या प्रकरणी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील नेहरू भवनाजवळ राहणारा लोकेश सोनवणे हा नऊ वर्षाचा बालक बुधवारी सकाळपासून बेपत्ता होता. त्याच्या पालकांनी सर्व ठिकाणी त्याचा शोध घेतला. मात्र, तो मिळाला नाही. शेवटी पालकांनी पोलिस स्थानकात फिर्याद दिल्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरुवारी एका बालकाचा मृतदेह रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर झुडपात रेल्वे रुळापासून काही अंतरांवर नागरिकांना दिसल्यानंतर त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते, रेल्वे पोलिस निरीक्षक जोगदंड यांच्यासह आरपीएफ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता मृतदेह बेपत्ता लोकशचा असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा एक हात कापलेला पाहून पोलिसांनाही धक्का बसला. तसेच त्याच्या मृतदेहाजवळ एक करवतही पोलिसांना सापडली. पोलिसांनी पंचनामा करून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेची माहिती कळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. आपला चिमुकला गमावल्याने सोनवणे कुटुंब अक्षरश: दु:खात बुडाले आहे.

सीसीटीव्ही फुटेजचा आधार

पोलिसांनी नेहरू भवन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक तरुण करवत घेऊन जात असल्याचे दिसून आले. संंबंधित संशयित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली जात आहे.

हेही वाचा :

The post Nashik Crime : करवतीने हात कापून बालकाची हत्या appeared first on पुढारी.