Nashik Crime : गुंगीचे औषध देऊन कारचालकास लुटणारा गजाआड

अटक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कारचालकास गुंगीचे औषध देऊन पैसे, मोबाइल नेणाऱ्यास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले आहे. शुभम ऊर्फ स्वदेश दीपक नागपुरे (२५, रा. आसनगाव, जि. ठाणे, सध्या रा. दिंडोरी रोड, नाशिक) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे.

राहुल शिवनंदन प्रसाद (२४, रा. ठाणे) हे कारचालक असून, ते एका कंपनीमार्फत ग्राहक मिळवत असतात. शनिवारी (दि. ६) ते मुंबईहून नाशिकच्या दिशेने ग्राहक घेऊन येत होते. ग्राहकाने राहुल प्रसाद यांना पिण्यास पाणी दिले. त्यामुळे त्यांना गुंगी आली. त्यानंतर ग्राहकाने राहुल यांच्याकडील पैशांचे पाकीट व मोबाइल घेऊन पळ काढला. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय ढमाळ व त्यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही व तांत्रिक माहितीआधारे शोध सुरू केला. पोलिस हवालदार सुरेश माळोदे यांना संशयिताची माहिती मिळताच पथकाने नाशिकरोड बसस्थानकाजवळ सापळा रचला. सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सहायक उपनिरीक्षक रवींद्र बागूल, शिपाई मुख्तार शेख यांच्या पथकाने शुभमला पकडले. त्याच्याजवळ राहुल प्रसाद यांचा मोबाइल आढळून आला. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्हे शाखेने शुभमचा ताबा भद्रकाली पोलिसांना दिला आहे.

हेही वाचा :

The post Nashik Crime : गुंगीचे औषध देऊन कारचालकास लुटणारा गजाआड appeared first on पुढारी.