Nashik Crime : ज्वेलर्स दुकान फोडून २६ लाखांचे दागिने लंपास

दागिने चोरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गंगापूर रोडवरील सावरकरनगर परिसरात टकले न्यू ज्वेलर्स दुकान फोडून चोरट्याने २५ लाख ७५ हजार रुपयांचे सोन्या-चांदीसह हिऱ्यांचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी अपूर्व रघुराज टकले (रा. माणिकनगर, गंगापूर रोड) यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेमुळे सराफी पेढींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

टकले यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने २० ते २१ मार्चदरम्यान, दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून व शटर उचकटून दुकानातील दागिने लंपास केले. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली. यात परिसरातील सीसीटीव्हींचीही तपासणी करण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्हीत चोरट्यांची हालचाल अस्पष्ट दिसत असल्याचे समजते. गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस तपास करीत आहेत.

गस्तीवर परिणाम

शहरात या आधी सराफी पेढी, बँका, आर्थिक व्यवहार होणाऱ्या ठिकाणी क्यूआर कोड स्कॅन लावले होते. पोलिसांना दर दोन तासांनी क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगितले होते. त्यामुळे पोलिसांची सतत गस्त होत होती. मात्र, कालांतराने याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने गस्तीवरही परिणाम झाला आहे.

याधीही चोरी

चोरट्यांनी या आधीही पंचवटीतील माउली ज्वेलर्स नावाचे दुकान फोडून तेथून एक लाख ८७ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरून नेले होते. त्यानंतर दागिने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या ग्राहकांनीही सराफ दुकानांमधून लाखो रुपयांचे दागिने लंपास केल्याचे प्रकार घडले आहेत.

हेही वाचा :

The post Nashik Crime : ज्वेलर्स दुकान फोडून २६ लाखांचे दागिने लंपास appeared first on पुढारी.