Nashik Crime : दारु सोडण्यावरुन झालेल्या वादात पित्याकडून मुलाची हत्या

डोक्यात पहार मारुन खून,www.pudhari.news

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा 

दारूच्या नशेत मुलगा वडीलांना म्हणाला माझे लग्न लावून देणार की नाही. तेव्हा वडिलांनी दारू सोडण्यास सांगितले असता मुलाने नकार देत दारूच्या नशेत वडीलांना शिवीगाळ करीत त्यांच्या डोक्यात लोखंडी पहार मारुन डोके फोडले. त्यावेळी जीव वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांनी मुलाच्या हाता-पायावर व डोक्यात लोखंडी पाईप व पहारीने वार केले. या झटापटीत दारूच्या नशेतील मुलगा रक्तबंबाळ होऊन जागीच मयत झाल्याची घटना तालुक्यातील पाटे शिवारातील पाटे – नारायणखेडे रोडलगत घडली. या घटनेबाबत चांदवड पोलिसांत संशयित आरोपी वडीलांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील पाटे गावच्या शिवारात कारभारी रावबा ठोके (६०) हे कुटुंबीयासोबत राहतात. त्यांचा मुलगा रविंद्र कारभारी ठोके (३२) हा रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दारू पिवून घरी आला. त्यावेळी त्याने वडिलांना विचारले, माझे लग्न कधी करून देता. त्यावेळी वडील म्हणाले तू पहिले दारू सोड. वडिलांच्या याच बोलण्याचा राग आल्याने मुलगा रविंद्रने दारूच्या नशेत घरात ठेवलेली लोखंडी पहार वडील कारभारी यांच्या डोक्यात मारली. यात वडील गंभीर जखमी झाले. जीव वाचवण्यासाठी कारभारी ठोके यांनी रविंद्रच्या डोक्यात, हातापायावर लोखंडी पाईप व पहारीने वार केले. या हल्ल्यात रविंद्र रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला. त्याला दवाखान्यात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच चांदवडचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर, पोलीस हवालदार मन्साराम बागुल, भाऊलाल हेंबाडे, दीपक मोरे आदींनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. यावेळी मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, मनमाडचे समीरसिंह साळवे यांनी भेट दिली. या घटनेबाबत प्रकाश कारभारी ठोके (४०) यांनी चांदवड पोलिसांत फिर्याद दिल्याने संशयित आरोपी कारभारी रावबा ठोके यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर करीत आहे.

हेही वाचा :

The post Nashik Crime : दारु सोडण्यावरुन झालेल्या वादात पित्याकडून मुलाची हत्या appeared first on पुढारी.