Nashik Crime : ब्लुटूथवरून पेपर सोडविणाऱ्या “मुन्नाभाई’विरोधात गुन्हा

तोतया परीक्षार्थी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ब्लुटूथचा वापर करून मित्राकडून उत्तरे जाणून घेत पेपर सोडविणाऱ्या कॉपी बहाद्दराविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका लिपिक पदाची परीक्षा नाशिकरोड केंद्रात झाली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. त्यातच पकडलेला परीक्षार्थी डमी परीक्षार्थी असल्याचे उघड झाल्याने मूळ परीक्षार्थीसह डमी व मध्यस्थाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रशासन अधिकारी नाना जयवंत मोरे यांनी उपनगर पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरून तोतया उमेदवार राहुल मोहन नागलोथ (२५), मूळ उमेदवार अर्जुन हारसिंग महेर आणि मध्यस्थ अर्जुन रामधन राजपूत (सर्व रा. रामेश्वर वाडी, खोडेगाव, छत्रपती संभाजीनगर) या तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयित नागलोथ याला परीक्षा केंद्रातून ताब्यात घेत पोलिसांनी अटक केली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लिपिक पदासह इतर रिक्त जागांसाठी दि. २६ ते २८ मे या कालावधीत विविध शहरांत तीन सत्रांत ई-परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी नाशिकरोड भागातील फ्युचरटेक सोल्युशन येथे एक केंद्र होते. या केंद्रात नागलोथने ब्लुटूथ लावून राजपूतला प्रश्न सांगत त्याच्याकडून उत्तरे घेत कॉपी केली. संशयित नागलोथ हा कानाला हात लावून पुटपुटत असल्याचे लक्षात आले. प्रशासन अधिकाऱ्यांसह इतरांनी त्याची अंगझडती घेतली. त्याच्याकडे इअरफोन, मोबाइलसह आधारकार्ड, दोन सीमकार्ड, मेमरी कार्ड मिळाले.

त्याने स्वत:चे नाव महेर असे सांगितले होते. मात्र सखोल चौकशीत त्याचे बिंग फुटले आणि त्याची खरी ओळख समोर आली. दरम्यान, त्याने प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे फोटो काढण्यासाठी मोबाइल वापरला. त्यानंतर जुलाब होत असल्याच्या बहाण्याने स्वच्छतागृहात मोबाइल दडवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे तिघांविरुद्ध फसवणुकीसह परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post Nashik Crime : ब्लुटूथवरून पेपर सोडविणाऱ्या "मुन्नाभाई'विरोधात गुन्हा appeared first on पुढारी.