Nashik Diwali 2022 : प्रवाशांच्या गर्दीने बसस्थानके गजबजली

नाशिक - बसस्थानके गजबजली,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोनामुळे गेली दोन वर्षे बंद असलेले सणोत्सव यंदा मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येत आहेत. दिवाळीच्या (Nashik Diwali 2022) पार्श्वभूमीवर वीकेण्डचा मुहूर्त साधत रविवारी (दि. 23) प्रवाशांनी बसस्थानकांमध्ये गर्दी केली होती. त्यामुळे शहरातील जुने सीबीएस, ठक्कर बाजार, महामार्ग, नाशिकरोड, निमाणी आदी बसस्थानकांचा परिसर गजबजला होता, तर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जादा बसेसचे नियोजन केले होते. दिवाळीनिमित्त तब्बल साडेसहाशे अतिरिक्त बसेस रस्त्यावर धावत आहेत.

दरवर्षी दिवाळी सुटीच्या हंगामात प्रवाशांकडून लालपरीला पसंती दिली जाते. विशेषत: लक्ष्मीपूजनानंतर दुसर्‍या दिवशी माहेरवाशिणी माहेरी जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेसचा पर्याय निवडतात. यंदाही दिवाळी सणाला उत्साहात प्रारंभ झाला असून, सोमवारी (दि. 24) लक्ष्मीपूजन, तर बुधवारी (दि. 26) भाऊबीज व पाडवा एकत्रित आल्याने अनेक नववधूंसह सासुरवाशिणींची माहेरी जाण्याची लगबग सुरू आहे. त्यातच शनिवार व रविवारच्या सलग सुट्या लागून आल्याने नागरिक वीकेण्डला घराबाहेर पडत असल्याचे चित्र दिसून आले.

एसटी प्रशासनाने नियमित फेर्‍यांसह नाशिकहून धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि कसारा आदी मार्गांवर जादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांच्या गर्दीनुसार बसेस उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मुंबई, नगर, सोलापूर, सातारा आदी भागांसाठी महामार्ग बसस्थानक, तर ठक्कर बाजार येथून खानदेश, औरंगाबाद, पुणे या मार्गांवर जादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. जुने सीबीएस बसस्थानकातून जिल्हाअंतर्गत मार्गावर लालपरी सोडण्यात येत आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्या हंगामात प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

24 तास तिकीट आरक्षणाची सुविधा
दिवाळीनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने 24 तास तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ठक्कर बाजार बसस्थानकात आगाऊ आरक्षणासाठी स्वतंत्र केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे, तर नाशिकरोड बसस्थानकातूनही प्रवाशांना आरक्षण करता येणार आहे. आगाऊ आरक्षणालाही प्रवाशांचा प्रतिसाद लाभत आहे.

हेही वाचा :

The post Nashik Diwali 2022 : प्रवाशांच्या गर्दीने बसस्थानके गजबजली appeared first on पुढारी.