नाशिक : पुढारी वृत्तसेवा; शहरात एमडी पुरवणाऱ्या पाच जणांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहेत. संशयितांनी जिल्ह्यात एमडीचा साठा लपवल्याचे पोलिस तपासात समोर आले असून, पोलिसांनी एमडीचा शोध सुरू केला आहे. तर ‘छोटी भाभी’ ड्रग्ज प्रकरणातील संशयित सलमान फलकेचे राजकीय कनेक्शन समोर आल्याने आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. (Nashik Drug Case )
सामनगाव परिसरात एमडी साठ्यासह पकडलेल्या गणेश शर्माच्या तपासातून अनेक संशयितांची ओळख पटली. त्यानुसार पोलिसांनी गोविंदा साबळे, आतिश चौधरी यांना सुरुवातीस अटक केली. त्यानंतर शहरातील मोठा ड्रग्ज पेडलर अर्जुन पिवाल, सनी पगारे, सुमित पगारे, मनोज ऊर्फ मन्ना गांगुर्डे यांना अटक केली. तर यांना ड्रग्ज पुरवठा करणारा संशयित भूषण ऊर्फ राजा मोरे यास ठाणे जिल्ह्यातून अटक केली. हे पाचही जण पोलिस कोठडीत आहेत. त्यांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना बुधवारी (दि.२५) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांच्या कोठडीत पाच दिवसांची वाढ केली आहे. दरम्यान, संशयितांनी दिलेल्या माहितीनुसार अमली विरोधी पथकाने शहरासह जिल्ह्यात छापासत्र सुरू केले आहे. त्यातून एमडीचा साठा पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते. संशयित पिवाल, पगारे व गांगुर्डे हे चौघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. (Nashik Drug Case )
त्यांनी कोरोनापूर्वी कारागृहात असताना तेथील इतर संशयितांच्या माध्यमातून मुंबईतील एमडी तस्करीची माहिती मिळवली. जामिनावर कारागृहाबाहेर आल्यावर अर्जुन पिवाल याने नाशिकमध्ये एमडी विक्रीला सुरुवात केली. दुसरीकडे ड्रग्ज माफिया ललित पानपाटील-पाटील यानेही कारागृहातून छाेटा राजन टोळीतील गुन्हेगारांच्या संपर्कात येत ड्रग्ज क्षेत्रात पाऊल टाकले. त्यामुळे सन २०१९ दरम्यान नाशिकच्या दोघांनी एकाचवेळी एमडी तस्करी करण्यास सुरुवात केल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. पोलिसांच्या तपासानुसार ललित व भूषण पानपाटील यांनी नाशिकमध्ये एमडी विक्री केलेली नाही. तर अर्जुन हाच नाशिकमध्ये मुंबईतून माल आणून इतर संशयितांच्या माध्यमातून विक्री करीत होता. त्यामुळे त्याच्या टोळीची कसून चौकशी सुरू आहे. त्यांनी आणलेला माल कोठे लपविला, ड्रग्ज विक्रीची पद्धत, ड्रग्जची विल्हेवाट लावली का, माल कोठून व कोणाला विक्री करायचे यासंदर्भातील तपास सुरू आहे.
हेही वाचा :
- नाशिक : चक्क विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात चोरी
- Assembly Elections : निवडणुकीनंतर इंडिया आघाडीचा फॉर्म्युला ठरणार
- Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | गुरुवार २६ ऑक्टोबर २०२३
The post Nashik Drug Case : शहरातील पाच ड्रग्ज पेडलरांच्या कोठडीत वाढ appeared first on पुढारी.