Nashik-Goa Airline : नव्या वर्षात नाशिक-गोवा विमानसेवा सुरु होणार

विमानसेवा नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

काही दिवसांपूर्वी नाशिकची कोलमडलेली विमानसेवा नव्या वर्षात, नव्या दमाने सुरू होणार आहे. नाशिककरांसाठी समाधानकारक बाब म्हणजे सुरुवातीपासूनच मागणी असलेली नाशिक-गोवा विमानसेवा (Nashik-Goa Airline) सुरू होत असून, बहुप्रतीक्षित इंडिगो विमान कंपनी अखेर नाशिकमध्ये आपली सेवा सुरू करणार आहे. मार्च २०२३ पासून इंडिगो आणि स्पाइस जेटकडून चार प्रमुख शहरांना जोडणारी सेवा सुरू केली जाणार आहे.

स्पाइस जेट आणि इंडिगो या कंपन्यांनी आपले उन्हाळी वेळापत्रक जाहीर केले असून, २६ मार्च २०२३ पासून गोवा, अहमदाबाद, नागपूर, बंगळुरू या प्रमुख शहरांत विमानसेवा सुरू केली जाणार आहे. सद्यस्थितीत नाशिक विमानतळावरून नाशिक-नवी दिल्ली, नाशिक-हैदराबाद या दोन शहरांसाठीच विमानसेवा सुरू आहे. या दोन्ही सेवांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता इंडिगो आणि स्पाइस जेट आणखी चार प्रमुख शहरांमध्ये सेवा सुरू करण्याबाबतचे पत्र हवाई वाहतूक मंत्रालय आणि ओझर विमानतळ प्रशासनाला दिले असून, नव्या वर्षाच्या मार्च महिन्यात या सेवा सुरू केल्या जाणार आहेत. दरम्यान, या सेवा सुरू व्हाव्यात याकरिता हिन्दुस्थान एरोनॅटिक्स लिमिटेड (एचएएल) प्रयत्न केले होते.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये नाशिक विमानतळावरून सेवा देणाऱ्या विमान कंपन्यांनी अचानकच विमानसेवा बंद करण्याबाबतचा निर्णय घेतल्याने, नाशिकची विमानसेवा पूर्णत: कोलमडली होती. एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या अलायन्स एअरने उडान योजनेची मुदत संपल्याचे सांगून अहमदाबाद, पुणे, बेळगाव ही सेवा बंद केली होती. त्यामुळे एकमेव स्पाइस जेट कंपनीकडून दिल्ली आणि हैदराबाद या दोन शहरांना जोडणारी सेवा सुरू होती. दरम्यान, आता इंडिगो आणि स्पाइस जेट नव्याने चार शहरांना जोडणारी सेवा सुरू करणार असल्याने नाशिकच्या विमानसेवेला गती मिळण्याची शक्यता आहे. स्पाइस जेट आणि इंडिगो या दोन कंपन्यांकडून २६ मार्च ते २८ ऑक्टोबर २०२३ पर्यंत ही सेवा दिली जाणार आहे.

स्पाइस जेटकडून आठवडाभर सेवा

स्पाइस जेट या कंपनीकडून आठवडाभर विमानसेवा सुरू ठेवली जाणार आहे. तर स्पाइस जेट आणि इंडिगो या दोन्ही कंपन्यांकडून अहमदाबाद आणि हैदराबाद या दोन शहरांसाठी सेवा दिली जाणार आहे. दोन्ही कंपन्यांनी आपले वेळापत्रक जाहीर केले असून, या सेवांमुळे नाशिकच्या विमानसेवेला मोठी गती मिळणार आहे.

हेही वाचा :

The post Nashik-Goa Airline : नव्या वर्षात नाशिक-गोवा विमानसेवा सुरु होणार appeared first on पुढारी.