Nashik Gram Panchayat : इगतपुरीच्या दोन्ही ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर

इगतपुरी,www.pudhari.news

नाशिक,  इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील २ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज घोषित करण्यात आला. काही वर्षांपूर्वी सरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्यांना थेट हेलिकॉप्टरने गावी आणणाऱ्या मुंढेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रचंड चुरस दिसून आली. हेलिकॉप्टरमुळे राज्यभर प्रसिद्ध असलेल्या मुंढेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंगला चंद्रकांत गतीर या निवडून आल्या. गाजलेले दिवंगत हायटेक सरपंच चंद्रकांत गतीर यांच्या त्या पत्नी आहेत. वर्षभरापूर्वी चंद्रकांत गतीर यांचे दुःखद निधन झाले होते. मुंढेगाव ग्रामस्थांनी त्यांच्या परिवारावर मोठा विश्वास टाकला आहे.

वासाळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनीता काशिनाथ कोरडे या निवडून आल्या. दोन्ही ग्रामपंचायतीचे निकाल पाहता युवकांचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे. मुंढेगाव ग्रामपंचायतीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसनेने सत्ता संपादन केली तर वासाळी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकला.

आदिवासी क्षेत्रात असणाऱ्या वासाळी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी सुनीता कोरडे यांनी सरपंचपद पटकावले. एकनाथ गणपत खादे, सखुबाई संतोष कोरडे, अनुसया मारुती खादे, बाळु नामदेव कचरे, भरत पांडुरंग कोरडे, ताराबाई भिका झोले, भरत हरी जाधव, सुगंधा कैलास जाखेरे, मोनिका मुकेश भालेराव हे सदस्यपदी निवडून आले. बहुचर्चित मुंढेगाव ग्रामपंचायत सरपंचपदी आमनेसामने झालेल्या लढतीत मंगल चंद्रकांत गतीर यांनी बाजी मारून सरपंचपदाचा मान पटकावला. ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी सुनिल बन्सी गतीर, सोमाबाई रमेश हंबीर, अलका सुनिल तांगडे, नितीन यशवंत हंबीर, हितेश बुधा हंबीर, मंगाबाई भगवान हंबीर, कृष्णा अंबादास दुभाषे, ललिता सुभाष गतीर, जनार्दन दौलत गतीर, ललिता लक्ष्मण गतीर, पदमाबाई मच्छिंद्र दळवी हे निवडून आले आहेत. दोन्ही ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्यांच्या विजयाची घोषणा होताच समर्थकांनी जल्लोष केला. इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी कामकाज झाले.

समान मते पडल्याने काढली चिठ्ठी

वासाळी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 3 च्या ग्रामपंचायत सदस्य पदाच्या उमेदवार प्रतिभा कचरे आणि मोनिका भालेराव यांना २३९ समसमान मते पडली. कस्तुरी वैभव बोरकर या शालेय मुलीने चिठ्ठी काढली असता त्यात मोनिका भालेराव या विजयी झाल्या. निकाल जाहीर झाल्यावर मोनिका भालेराव यांनी आनंदाश्रू अनावर झाले. त्यांनी चिठ्ठी काढणाऱ्या मुलीला मिठी मारून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

The post Nashik Gram Panchayat : इगतपुरीच्या दोन्ही ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर appeared first on पुढारी.