Nashik Igatpuri : जिंदाल पॉलिफिल्ममध्ये सापडला तिसरा मृतदेह

मृतदेह जिंदाल कारखाना,www.pudhari.news

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा

मुंढेगाव शिवारातील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत बुधवारी (दि.४) ढिगारे उपसताना गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कामगाराचा मृतदेह आढळून आला आहे. धीर मिश्रा (वय ३८, रा अलाहाबाद, उत्तर प्रदेश) असे या कामगाराचे नाव आहे. कंपनीच्या माहितीप्रमाणे या दुर्घटनेत आतापर्यंत दोन महिला व एक पुरुष कामगाराचा मृत्यू झाला असून, १७ कामगार जखमी आहेत.

चार दिवसांनंतर कंपनीतील आग बुधवारी पूर्णत: आटोक्यात आली. तीन दिवसांपासून २० अग्निशमन बंबांनी ही आग आटोक्यात आणली. बुधवारी केवळ तीन बंब आग विझवण्याचे काम करत होते. बुधवारी खासदार हेमंत गोडसे यांनी आग लागलेल्या प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाला नसून थर्ममिनल या रसायनच्या गॅस गळतीमुळे ही आग लागल्याचे बुधवारी उघड झाल्याची माहिती येथील कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गोडसे यांना दिली. सदर थर्ममिनल रसायनाचा गॅस हा पाइपमध्ये असतो. याच थर्ममिनल रसायनच्या गॅसची पाइपमधून गळती झाल्याने स्फोट होऊन ही भयंकर आग लागल्याचे कंपनी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आगीत आठ मजली असलेली प्रकल्पाची इमारत पूर्णत: जळून खाक झाली आहे. आजपर्यंत या जळालेल्या आठ मजली इमारतीमध्ये कोणीही प्रवेश केला नसल्यामुळे या इमारतीमध्ये आणखी मृत कामगार असल्याची चर्चा सुरू आहे.

पोलिस उपअधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली घोटीचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी पोलिस पथकासह कंपनीत पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. या पंचनाम्यात कंपनीत असलेल्या कामगारांची चौकशी सुरू असून, बेपत्ता कामगारांचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा :

The post Nashik Igatpuri : जिंदाल पॉलिफिल्ममध्ये सापडला तिसरा मृतदेह appeared first on पुढारी.