Nashik Igatpuri : जिंदालमध्ये ढिगारे हटविण्याचे काम युद्ध पातळीवर

जिंदाल कंपनी इगतपुरी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

इगतपूरी तालूक्यातील जिंदाल कंपनीत गुरूवारी (दि.५) सलग पाचव्या दिवशी पोलीस व महसुल यंत्रणा तळ ठोकून आहे. कंपनी परिसरातील धुराचे प्रमाण कमी झाले असून ढिगारे हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

नववर्षाच्या प्रारंभी जिंदाल कंपनीत झालेल्या बाॅयलर स्फोटामूळे तीघा कामगारांना जीव गमवावा लागला आहे. तर १७ कामगार जखमी असून त्यांच्यावर नाशिकमधील रूग्णालयांत उपचार सुरू आहे. या स्फोटाने अवघा कंपनी परिसर कवेत घेतला आहे. घटनेच्या पाचव्या दिवशी काही प्रमाणत परिसरात धूर निघत असल्याचे कळते आहे. घटनेनंतर अद्यापही कंपनीच्या परिसरातील ढिगारे बाजूला केले जात आहेत. तसेच कंपनी आवारातील कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांकडून जळालेले व निकामी साहित्यही हटविण्यात येत आहे. सदर घटनेत ८३ कामगारांचा त्यांच्या कुटूंबाशी संवाद झाला नसल्याचा दावा घोटीतील एका शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाकडे केला आहे. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महसुल व पोलीस प्रशासनाने पहिल्या दिवसापासून कंपनी परिसरात तळ ठाेकला आहे. या दोन्ही विभागांचे अधिकारी गुरूवारीदेखील (दि.५) कंपनीच्या आवारातील परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते.

समितीकडून होणार चाैकशी

घटनेच्या पाचव्या दिवसानंतरही जिंदाल कंपनीतून काही प्रमाणात धुर बाहेर पडतो आहे. यासर्व घटनेच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी समिती गठीत केली आहे. नाशिकचे अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधी यांच्या अध्यक्षतेत समिती संपूर्ण घटनेचा तपास करणार आहे.

हेही वाचा :

The post Nashik Igatpuri : जिंदालमध्ये ढिगारे हटविण्याचे काम युद्ध पातळीवर appeared first on पुढारी.