Nashik Malegaon : पोलिस नाईकपाठोपाठ ‘पीआय’ लाचलुचपतच्या जाळ्यात

लाचप्रकरण

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
किल्ला पोलिस ठाण्यातील पोलिस नाईकवर कारवाई होण्यास महिनाही उलटला नसताना शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (दि.30) रात्री नियंत्रण कक्ष आवारातच ही कारवाई झाली. पोलिस निरीक्षक सुरेशकुमार घुसर असे अधिकार्‍याचे नाव आहे.

तक्रारदार यांचा भाऊ व त्याचे दोन मित्र 3 सप्टेंबर रोजी जेवण करून घरी परतत असताना ते एमडी या नशेच्या पदार्थाशी संबंधित आहेत, या संशयावरून त्यांना मालेगाव शहर पोलीस ठाणे येथे नेण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांचा भाऊ व त्याचे दोन मित्र यांच्याकडे सुरुवातीस एक लाख रुपयांची मागणी झाली. नंतर ५० हजार रुपयांची बोलणी झाली. तडजोडी अंति तक्रारदार यांच्या भावाकडे २० हजार रुपयांची मागणी झाल्याचा तक्रारीत दावा करण्यात येत आहे.

ही रक्कम सय्यद राशीद सय्यद रफिक ऊर्फ राशीद बाटा यांच्या माध्यमातून पोलिस नाईक आत्माराम काशिनाथ पाटील यांनी स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यात नंतर पोलिस निरीक्षक घुसर यांचे नाव घेण्यात आले. त्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात असून त्याचा संबंध १२ नोव्हेंबरची दंगल आणि अमली पदार्थ विरोधी कारवाईशी जोडला जात आहे.

दरम्यान, महिन्याच्या प्रारंभी 7 तारखेला एका आरोपीवर गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल न करण्याच्या बदल्यात तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना किल्ला पोलिस ठाण्याचे नाईक तानाजी कापसे यांनाही अटक झाली होती.

हेही वाचा :

The post Nashik Malegaon : पोलिस नाईकपाठोपाठ ‘पीआय’ लाचलुचपतच्या जाळ्यात appeared first on पुढारी.