Nashik Malegaon : मालेगावी मनपाची प्रभाग एकमध्ये अतिक्रमण निर्मूलन मोहीम

मालेगाव मनपा,www.pudhari.news

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
मालेगाव महापालिकेने शुक्रवारी (दि.7) प्रभाग क्रमांक एकच्या कार्यक्षेत्रात धडक अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवून पक्क्या बांधकामांवर हातोडा मारला. काही दिवसांपूर्वी याच भागातील काही नागरिकांनी गटारकामाला अडथळा ठरणार्‍या अतिक्रमणांविरोधात आंदोलन केले होते. त्याची गंभीर दखल प्रशासक भालचंद्र गोसावी यांनी घेतली.

सर्व्हे नंबर 98 येथे भुयारी गटारीचे काम प्रस्तावित होते. मात्र त्याला प्लॉट नंबर 31 येथील अतिरिक्त बांधकाम अडथळा ठरत होते. परिणामी, या भागात सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्रस्त नागरिकांनी गेल्या 7 ऑक्टोबरला प्रभाग 1 समोर आंदोलन करीत प्रभाग अधिकारी सुधाकर बडगुजर यांना निवेदन दिले होते. या तक्रारीची दखल आयुक्तांनी घेतली.

अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी यांच्या आदेशानुसार उपआयुक्त सतीश दिघे यांनी सहायक आयुक्त सुनील खडके यांच्या सहकार्याने कारवाईची प्रक्रिया पूर्ण केली. अतिक्रमणधारकांना जागेची मोजणी करून अनधिकृत बांधकाम स्वतःहून काढून घेण्याची नोटीस बजावली होती. त्यास प्रतिसाद न मिळाल्याने शुक्रवारी जेसीबीने अतिक्रमण हटविण्यात आले. या कारवाईचे स्वागत होत असून प्रमुख मार्ग आणि चौकांतील अतिक्रमणांवर हातोडा मारण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा :

The post Nashik Malegaon : मालेगावी मनपाची प्रभाग एकमध्ये अतिक्रमण निर्मूलन मोहीम appeared first on पुढारी.