Nashik Murder : कातरवाडी गावातील ‘त्या’ खुनाचा छडा, पत्नीसह दोघांना बेड्या

खून प्रकरणी पत्नीसह दोघांना बेड्या,www.pudhari.news

नाशिक, चांदवड : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील कातरवाडी गावात दोन दिवसांपूर्वी झालेल्या खून प्रकरणाचा (Nashik Murder) छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, मृताच्या पत्नीसह तिच्या दोघा संशयित साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. संशयितांना चांदवड न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी दिली. मात्र, खुनाचे कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कातरवाडी शिवारात मंगळवारी (दि.11) वयोवृद्ध वडील बाबूराव महादू झाल्टे हे आजारी असल्याने मुलगा सोपान (40) हा त्यांच्यासोबत पत्र्याच्या शेडमध्ये झोपला होता. यावेळी अज्ञात मारेकर्‍यांनी लाकडी दांडक्याने सोपान झाल्टे यांच्या डोक्यात वार करीत खून केल्याची थरारक घटना घडली होती. या घटनेबाबत मृताची पत्नी मनीषा सोपान झाल्टे यांनी चांदवड पोलिसांत फिर्याद दिल्याने अज्ञात मारेकर्‍यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेनंतर मनमाडचे पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, चांदवडचे पोलिस निरीक्षक समीर बारवकर, पोलिस उपनिरीक्षक सुरेश चौधरी, पोलिस हवालदार अशोक पवार, मंगेश डोंगरे, उत्तम गोसावी आदींनी सूत्रे हलवत मृत सोपान झाल्टे यांचे मित्र परिवार, नातेवाइक यांची कसून चौकशी केली. मनीषा हिची चौकशी केली असता तिने दोन जणांच्या मदतीने खून केल्याचे कबूल केले. यावेळी संशयित आरोपी मनीषा सोपान झाल्टे, सुभाष संसारे व त्याचा साथीदार जलील शहा या तिघांना चांदवड पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा :

The post Nashik Murder : कातरवाडी गावातील 'त्या' खुनाचा छडा, पत्नीसह दोघांना बेड्या appeared first on पुढारी.