Site icon

Nashik Murder : महिलेच्या खुनानंतर खंबाळे गावात तणाव

घोटी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

कपडे धुण्यासाठी गेलेल्या एक विवाहित महिलेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना घडल्याने खंबाळे आणि घोटीत तणावाची स्थिती निर्माण झाली. इगतपुरी तालुक्यातील खंबाळे शिवारात मद्यप्राशन करून दबा धरून बसलेल्या इसमांनी हे कृत्य केले असून, त्यातील एका संशयितास ग्रामस्थांनी पोलिसांच्या हवाली केले आहे. संतप्त नागरिकांनी घोटी पोलिस ठाण्याला दिवसभर घेराव घालत नराधमांवर कठोर कारवाईची मागणी केली.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 21) सकाळी दहाच्या सुमारास खंबाळे गावातील महिला नेहमीप्रमाणे कपडे धुण्यासाठी जवळच शासकीय विश्रामग्रहालगत असलेल्या खाणीजवळ गेली होती. तेथे एका अनोळखी इसमाने तिला घेरले व बळजबरीने तिच्यावर अत्याचार केले व याबाबत वाच्यता होऊ नये म्हणून तिच्या डोक्यात दगड घालत तिला मारून टाकले. परिसरातील नागरिकांना ही घटना समजताच त्यांनी धाव घेतली. घटनास्थळी असलेल्या एका संशयितास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. दरम्यान, या घटनेत तिघांचा सहभाग असल्याचे समजते. त्यातील दोघे फरार आहेत. घटनेची माहिती मिळताच खंबाळे ग्रामस्थ व मृत महिलेच्या नातलगांनी घोटी ग्रामीण रुग्णालय व पोलिस ठाणे आवारात एकच गर्दी केली होती.

दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, अपर अधीक्षक माधुरी कांगणे यांनी घोटी पोलिस ठाण्यात दुपारपासून तळ ठोकून परिस्थिती नियंत्रणात आणली. संतप्त नागरिकांनी तसेच खंबाळे ग्रामस्थांनी घोटी ठाण्याला घेराव घातला. नातलगांच्या आक्रोशाला पोलिस अधिकाऱ्यांनाही सामोरे जावे लागले. रात्री उशिरापर्यंत या घटनेबाबतचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पीडित महिलेचे शव घोटी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तेथून शवविच्छेदनासाठी तिचा मृतदेह नाशिकला जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक येथे पाठविण्यात आला. दोघा फरार संशयितांना पकडण्यासाठी पोलिसांची पथके पाठवली असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, आमदार हिरामण खोसकर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी घोटी पोलिस ठाण्यात धाव घेऊन पोलिस अधीक्षकांशी चर्चा केली. या घटनेचे गांभीर्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन घटनेतील संशयितांवर कठोर कारवाई करण्याची आग्रही मागणी धरली.

नातलगांचा आक्रोश

या खळबळजनक घटनेची माहिती मिळताच खंबाळे, घोटी परिसरातील नागरिकांसह मृत महिलेच्या नातलगांनी घोटी पोलिस ठाण्यात धाव घेऊन आक्रोश व्यक्त केला. या घटनेतील संशयितांना आमच्या ताब्यात द्या तसेच सर्व संशयितांना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी यावेळी केली.

हेही वाचा :

The post Nashik Murder : महिलेच्या खुनानंतर खंबाळे गावात तणाव appeared first on पुढारी.

Exit mobile version