Nashik murder : आधी फावडे, नंतर कोयत्याने तोडले महिलेचे पाय

मालेगाव खून,www.pudhari.news

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
दहिदी शिवारात पिकाला पाणी देणार्‍या विवाहितेचा क्रौर्याचा कळस गाठत खून करणार्‍याचा 72 तासांत छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. महिलेच्या अंगावरील दागिने लुटण्याच्या उद्देशाने किरण ओमकार गोलाईत (32, रा. साजवहाळ) याने हे कृत्य केल्याचे तपासात उघड झाले आहे. महिलेच्या पायातील चांदीचे वाळे काढण्यासाठी त्याने आधी फावड्याने पाय तोडून पाहिले. त्यात यश न आल्याने बाजारातून कोयता आणत हेतू साध्य केल्याची कबुली या संशयिताने दिली आहे.

सोमवारी (दि. 30) ही अंगाचा थरकाप उडविणारी घटना घडली होती. सुमनबाई भास्कर बिचकुले (28) या शेतातील कांद्याला पाणी देत होत्या. त्यांचे सासू-सासरे वैद्यकीय कारणास्तव रुग्णालयात, तर पती भास्कर हे मका विक्रीसाठी बाजारात गेले होते. घरी केवळ अंध दीर होता. शिवारात कुणीच नसताना अज्ञाताने सुमनबाई यांच्यावर प्राणघातक हल्ला करीत अत्यंत निर्दयपणे खून केला. त्या बेपत्ता असल्याने पती व शेजार्‍यांनी शोधाशोध केली. शेतापासून काही अंतरावर तुटलेल्या पायाचे बोट निदर्शनास येऊन, जवळच दगड आणि मातीखाली निर्वस्त्र मृतदेह आढळला होता. दोन्ही पाय घोट्यापासून तोडलेले आणि एकूणच अवस्था पाहून सर्वांच्या काळजाचा थरकाप उडाला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळाची पाहणी करीत तपासाची चक्रे फिरविली. तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक हेमंत पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास केला. फॉरेन्सिक टीम व श्वान पथकानेही घटनास्थळाची पाहणी केली. घटनेच्या दुसर्‍या दिवशी मंगळवारी (दि.31) सायंकाळी अंत्यविधी करण्यात आला. यावेळी पोलिसांनी गर्दीतील संशयास्पद हालचाली टिपण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यातून काहीच धागेदोरे हाती लागले नव्हते. महिलेच्या अंगावरील दागिने गायब असल्याने चोरीच्या उद्देशाने हा खून झाला असावा, या दिशेने तपासाला गती देण्यात आली. तालुका व परिसरातील सराफ दुकानदारांना संशयास्पद व्यक्तीची माहिती देण्याविषयी सुचविण्यात आले. हीच खबरदारी खुन्यापर्यंत पोहोचण्यात कामी आली.

घटनेनंतर दुसर्‍या दिवशी…

घटनेनंतर दुसर्‍या दिवशीच एक तरुण करंजगव्हाणमधील सराफाकडे दागिने विक्रीसाठी गेला होता. त्याविषयी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तेथील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले. त्यातील तरुणाच्या छायाचित्राच्या आधारे शोध सुरू झाला. त्यात गुरुवारी (दि. 2) हा संशयित तरुण डोंगराळे शिवारात असल्याची माहिती मिळाली होती. पथकाची आणि संशयिताची डोंगराळेजवळील तलावाजवळ नजरानजर झाली. आपले बिंग फुटल्याचे लक्षात येताच तरुणाने तलावात उडी घेत पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोहता येत नसल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. क्षणाचाही विलंब न लावता अंमलदार शरद मोगल व दत्ता माळी यांनी पाण्यात झेपावत संशयिताला सुरक्षित बाहेर काढले. याच ठिकाणी केलेल्या उलटतपासणीत त्याने दहिदी खुनाची कबुली दिली. भौतिक पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींनी केलेल्या वर्णनाची सांगड घालून शुक्रवारी (दि. 3) आरोपीला तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे, रवींद्र वानखेडे, हवालदार जालिंदर खराटे, पोलिस नाईक शरद मोगल, सुभाष चोपडा, फिरोज पठाण यांनी ही कामगिरी पार पाडली. यशस्वी तपासाबद्दल पथकाला पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी 25 हजारांचे बक्षीस जाहीर केले.

हेही वाचा :

The post Nashik murder : आधी फावडे, नंतर कोयत्याने तोडले महिलेचे पाय appeared first on पुढारी.