
नाशिक : पुढारी वृत्तसेवा; विनापरवाना कॉफी शॉप सुरू करून, इमारतीच्या मूळ रचनेत बदल करीत, विनापरवानगी खाद्यविक्री करण्यासोबतच चुकीच्या पद्धतीने कापडी किंवा लाकडी कंपार्टमेंट करीत मुला-मुलींना ‘आडोसा’ देणारी शहरातील नऊ कॅफे शहर पोलिस व महापालिकेने सील केली आहेत. तसेच चार कॅफे चालकांविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (Nashik News)
अल्पवयीन मुला-मुलींसह तरुण-तरुणी कॅफेत अश्लील कृत्य करत असल्याच्या तक्रारी हाेत्या. त्यातच बलात्काराच्या एका प्रकरणामध्ये संशयिताने कॉलेजरोडवरील कॅफेत बलात्कार केल्याचीही तक्रार पीडितेने केली होती. त्यावेळी पोलिसांनी कॉलेजरोडवरील एका कॅफेवर कारवाई केली. मात्र त्यानंतर ही कारवाई थंड झाली. दरम्यान, सिन्नर येथे पोलिसांनी कारवाई करीत कॅफेतील अश्लील कृत्य उघडकीस आणले. तसेच दै. ‘पुढारी’नेदेखील ‘कॅफेतील एकांत ठरतोय अत्याराचे कारण’ या मथळ्याखाली शहरातील कॅफेंमधील चित्र मांडले. त्यानंतर शहर पोलिस व महानगरपालिकेने संयुक्तरीत्या तपासणी मोहीम राबवली. इंदिरानगर पोलिसांनी कारवाई करीत चार कॅफेचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. या कॅफेंमध्ये कॉफी शॉप सुरू करण्याचा परवाना नव्हता. तरीही बोर्ड लावून कॅफेची जाहिरात केल्याचे, कॅफेत अंधार केलेला आढळून आला. तसेच कापडी कंपार्टमेंट करीत त्यात पडदे लावून आतमध्ये टेबल-खुर्ची ठेवलेल्या आढळले. या ठिकाणी जोडपे अश्लील कृत्य करीत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
या कॅफे चालकांविरोधात गुन्हा
अमोल लहू पिंगळे (३०, रा. उत्तमनगर), अनिकेत सोमनाथ अहिरे (२१, रा. पंडितनगर, सिडको), विवेक प्रवीण सोनजे (२२, रा. उंटवाडी) व दिनेश प्रभाकर जावरे (२८, रा. उत्तमनगर) या कॅफे चालकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी बापू बंगला परिसराजवळील ब्लॅक स्पून कॅफे, सराफनगर येथील टोकियो कॅफे, वडाळा-पाथर्डी रोडवरील ब्लॅक स्पून कॅफे व दक्ष इम्पेरिया हे कॅफे सुरू केले होते.
कॉलेजरोड, गंगापूर रोड भागातील नऊ कॅफेंवर कारवाई केली जात असून, या ठिकाणी मूळ बांधकाम परवानगी तसेच वापराच्या दृष्टिकोनाने झालेले अनधिकृत बदल, व्यावसायिक घरपट्टीची नोंद आहे का या सर्वांची पडताळणी करून कारवाई केली जाणार आहे.
– संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता, नगररचना, मनपा
कॅफे केली सील
१) सिझर कॅफे, एस. के. मॉल, हाॅलमार्क चौक, कॉलेजरोड
२) यारी कटटा, कटारिया ब्रीज, सुयोजित कॉम्प्लेक्स
३) कॅफे क्लासिक डे लाइट, सुयोजित कॉम्प्लेक्स
४) हॅरिज किचन कॅफे, सुयोजित कॉम्प्लेक्स
५) लकीज कॅफे, थत्तेनगर, गंगापूर रोड
६) पॉकेट कॅफे, श्रध्दा मॉल, कॉलेजरोड
७) वालाज कॅफेटेरिया, श्रध्दा मॉल, कॉलेजरोड
८) मुरली कॅफे, महात्मानगर
९) मॅझिक वर्ल्ड कॅफे, शॉप नं. ४, ऋषिराज होरिजन अपार्टमेंट, नाशिक
हेही वाचा :
- …तर पावसाचे चक्र बिघडू शकते
- छत्रपती संभाजीनगर : अजिंठा अर्बन बँकेत ९७.४१ कोटींचा अपहार; सीईओ, सनदी लेखापालासह अनेकांविरुद्ध गुन्हा
The post Nashik News : 'आडोसा' देणारे नऊ कॅफे सील appeared first on पुढारी.