Nashik News : जायकवाडीला पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा विरोध

जायकवाडी पाणी विरोध,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जायकवाडीला नाशिकच्या धरणांतून पाणी सोडण्याच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निर्णयाला नाशिक तालुक्यातील सय्यदपिंप्री गावातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी भाजप आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी शासनाकडे केल्यानंतर या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (दि.२) आ. फरांदे यांची भेट घेत त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले.

जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असताना नाशिक व नगरच्या धरणांतून ८.६०३ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने आदेश दिले आहेत. या निर्णयाविरोधात भाजपच्या नाशिक मध्यच्या आमदार फरांदे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या चुकीच्या निर्णयामुळे नाशिक व नगरमधील शेतकऱ्यांवर अन्याय होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली असून, यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा करत निर्णयास स्थगिती देण्याची मागणी केली. विशेष बाब म्हणून जायकवाडीच्या मृत साठ्यातून जायकवाडी जलाशयात ६५ टक्के उपयुक्त पाणीसाठा होण्यासाठी ५.९४ टीएमसी पाणीसाठा वापरण्यास शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. गत अनुभव पाहता पाणी सोडल्यावर वहनतूट ४० ते ४५ टक्के येणार आहे. त्यामुळे जायकवाडीत किती पाणी पोहोचू शकेल, असा सवालही आ. फरांदे यांनी उपस्थित केला. त्यामुळे या निर्णयाला स्थगिती दिल्याचे बोलले जाते.

आम्ही तुमच्या पाठीशी!

आमदार फरांदे यांनी नाशिककरांच्या वतीने विरोध नोंदवल्याने सय्यदपिंप्री गावातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आमदार फरांदे यांच्या निवासस्थानी भेट घेत भूमिकेला पाठिंबा दर्शविला. पाणीप्रश्नी आम्ही आपल्यासोबत असल्याचे सांगत शेतकर्‍यांनी दुष्काळी परिस्थितीबाबत वास्तव मांडले. यावेळी अनिल ढिकले, भाऊसाहेब ढिकले, शंकर ढिकले, मनोज जाधव, यशवंत ढिकले, जयराम ढिकले, नामदेव ढिकले, देवीदास पाटील, पंडित जाधव, बाळासाहेब उखाडे, अंबादास ढिकले, उत्तम ढिकले आदींसह शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post Nashik News : जायकवाडीला पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा विरोध appeared first on पुढारी.