Nashik News : जिल्ह्यातील पाणी आरक्षणावर आज अंतिम मोहोर

नाशिक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जिल्ह्यातील पाणी आरक्षणावर अंतिम माेहोर उमटविण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेत सोमवारी (दि.६) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता नाशिक महापालिकेने ६ हजार १०० दलघफू पाण्याची मागणी नोंदविली आहे. मनपाच्या मागणीसंदर्भात पालकमंत्री काय निर्णय घेतात याकडे आता साऱ्या नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबरच्या प्रारंभीच पाण्याचे संकट अधिक गडद बनले आहे. नाशिक जिल्हाही त्यास अपवाद ठरलेला नाही. जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याची सध्याची उपलब्धता बघता पालकमंत्र्यांनी पिण्याचे पाणी व जनावरांच्या पाण्याला प्राधान्य देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर सिंचन व औद्यागिक वापराच्या पाण्याचे नियोजन करायचे आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने त्यांच्याकडे प्राप्त प्रस्तावांनुसार पाण्याचे आरक्षण केले आहे.

नाशिक महापालिकेने १५ आॅक्टोबर २०२३ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीसाठी ६ हजार १०० दलघफू पाण्याची मागणी नोंदविली आहे. त्यामध्ये गंगापूरमधून ४४००, दारणातून १०० व मुकणेतून १ हजार ६०० दलघफू पाणी आरक्षणाची विनंती करण्यात आली आहे. याशिवाय मालेगाव मनपा, जिल्ह्यातील नगरपालिका-नगरपंचायती, विविध खेडी योजना, विशेष पाणीपुरवठा योजनांची मागणी केली आहे. दुष्काळी परिस्थिती व पाण्याची उपलब्धता यानुसार जिल्हा प्रशासनाने त्या-त्या धरणांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठीचे आरक्षण नियोजन केले आहे. आरक्षणाच्या या प्रस्तावावर ना. भुसे हे अंतिमत: स्वाक्षरी करतील. त्यामुळे मागणीनिहाय पाणी देणार का हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

३.१ टीएमसी वगळून निर्णय

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभागाने जायकवाडीसाठी नाशिकमधील गंगापूर व दारणा धरण समूहातून ३.१४३ टीएमसी पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुूळे नााशिक जिल्ह्याचे पाणी आरक्षण करताना हा साठा वगळून उर्वरित साठ्यातून नियोजन करावे लागेल, अशी माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे.

नाशिक मनपा मागणी

धरण             दलघफूमध्ये

गंगापूर             ४४००

दारणा             १००

मुकणे             १६००

एकूण             ६१००

हेही वाचा :

The post Nashik News : जिल्ह्यातील पाणी आरक्षणावर आज अंतिम मोहोर appeared first on पुढारी.