
नाशिक : पुढारी वृत्तसेवा; आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होणार असल्याने शनिवार (दि. ४) ते १५ नोव्हेंबरपर्यंत बाजारपेठ परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार आहे. या मार्गावर सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे.
पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार, आगामी काळात बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेता, हा बदल केला जाणार आहे. त्यामध्ये मालेगाव स्टॅण्ड ते रविवार कारंजाकडे येणारी मालवाहू वाहने, दिल्ली दरवाजा ते धुमाळ पॉइंटपर्यंत येणारी वाहने, रोकडोबा मैदान ते भद्रकाली येथील साक्षी गणेश मंदिर, बादशाही कॉर्नर ते गाडगे महाराज पुतळा, नेपाळी कॉर्नर ते मेनरोडमार्गे धुमाळ पॉइंट, सांगली बँक सिग्नल ते धुमाळ पॉइंट मेनरोडकडे जाणारी वाहने, रविवार कारंजा ते धुमाळ पॉइंट हा मार्ग वाहतुकीकरिता पूर्णपणे बंद असणार आहे. या मार्गांवर केवळ पादचाऱ्यांना मार्गक्रमण करता येईल. तर या मार्गांवरील वाहने मालेगाव स्टॅण्ड-मखमलाबाद नाका, रामवाडी, बायजाबाई छावणी, चोपडा लॉन्स, गंगापूर नाका या मार्गे इतरत्र वळविता येतील. तसेच सीबीएस, शालिमारकडून जुने नाशिक परिसरात जाण्या-येण्यासाठी शालिमार, खडकाळी (गंजमाळ) सिग्नल, दूधबाजार चौक या मार्गाचा वापर करता येईल.
पार्किंगची ठिकाणेही निश्चित
बाजारपेठेतील गर्दी टाळण्यासाठी वाहनांना प्रवेशबंदी करतानाच पार्किंगची ठिकाणेदेखील निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने गोदाघाट, गाडगे महाराज पुलाखाली, सागरमल मोदी विद्यालय पे ॲण्ड पार्क आणि कालिदास कलामंदिरसमोरील पे ॲण्ड पार्कमध्ये वाहने पार्किंग करता येतील.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
बाजारपेठेत नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेता वाहन प्रवेशबंदीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांकडून रविवार कारंजा, सांगली बँक सिग्नल, नेपाळी कॉर्नर, बादशाही कॉर्नर, गाडगे महाराज पुतळा कॉर्नर याठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत प्रत्येकी चार पोलिस अंमलदार याठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत.
हेही वाचा :
- Pimpri News : वाहतूक पोलिसांचा अजब कारभार; निषिद्ध वेळेतही अवजड वाहनांचा शहरात प्रवेश!
- दारूसाठी पैसे न दिल्याने मांगलेतील वृद्धाचा खून
- Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | शनिवार, ४ नोव्हेंबर २०२३
The post Nashik News : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात आजपासून बदल appeared first on पुढारी.