Nashik News : धूर सोडणाऱ्यांना’कोटपा’चा दणका

धूम्रपान

नाशिक : गौरव अहिरे

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांसह प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कोटपा कायद्यानुसार कारवाई केली जाते. त्यात दंडाची तरतूद असल्याने त्याचा फटका धूम्रपान करणाऱ्यांसह विक्रेत्यांना बसत आहे. शहर पोलिसांनी चालू वर्षात सुमारे ४०० जणांवर कोटपा कायद्यानुसार कारवाई केली आहे.

शहरात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यात तरुणींचे प्रमाणही लक्षणीय असल्याने ही चिंतेची बाब आहे. शहरात शैक्षणिक संस्था वाढल्याने देश-विदेशातील विद्यार्थी शहरात शिक्षणासाठी येतात. त्यामुळे स्थानिक-बाहेरील तरुणाईच्या आवडी-निवडी वेगवेगळ्या असल्या, तरी त्या आत्मसात करण्यावर सर्वांचा भर दिसतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणे, हुक्का ओढणे, अमली पदार्थांचे व्यसन करणे आदी गंभीर प्रकारही समोर आले आहेत. त्यामुळे शहर पोलिसांनी मूळ प्रवाह साेडून व्यसनांच्या आहारी जाणाऱ्या तरुणाईवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार हुक्का, अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांवरही कारवाईचा दणका दिला आहे. तर शैक्षणिक संस्थाजवळ किंवा प्रतिबंधित क्षेत्रात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कोटपा कायद्यानुसार कारवाई केली जात आहे. त्यानुसार शहर पोलिसांनी चालू वर्षात ३९० जणांवर कोटपा कायद्यानुसार कारवाई केली आहे. त्यात तरुणांचा सर्वाधिक समावेश आहे. या कारवाईमुळे तरुण वर्गामध्ये काहीशी भीती असून, ते चोरून धूम्रपान करत असल्याचे बोलले जाते.

काय आहे कोटपा-२००३ कायदा?

सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात आणि व्यापार विनिमय, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा व वितरण प्रतिबंध कायदा) अधिनियम २००३ हा केंद्र सरकरचा कायदा आहे. या कायद्यात एकूण पाच प्रमुख कलमे आहेत. त्यापैकी कलम-४ नुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे गुन्हा आहे. तर कलम- ७ नुसार कोणत्याही शैक्षणिक संन्स्थेच्या १०० यार्ड आवारात तंबाखूजन्य पदार्थविक्रीवर प्रतिबंध आहे. कलम- ६ ब नुसार बालकांना किंवा बालकांकडून तंबाखूजन्य पदार्थविक्रीवर प्रतिबंध आहेत. या कायद्यानुसार २०० रुपये चलन पावती दंड किवा बाल न्याय कायदा २०१५ नुसार १ लाख रुपये आणि ७ वर्षे शिक्षेची तरतूद केली आहे. बाल न्याय कायदा कलम ७७ नुसार कारवाई करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.

दुकानांसमोर गर्दी

शहरातील पानटपऱ्यांसह काही दुकाने सर्रास सिगारेट व प्रतिबंध असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करतात. या दुकानांमध्ये चहा, मॅगी, सँडविच, शीतपेये मिळत असल्याने विद्यार्थी वर्ग जास्त आकर्षिक होत असल्याचे चित्र आहे. बसण्यास पुरेशी जागा व उधारीची व्यवस्था असल्याने तरुण-तरुणी या दुकानांमध्ये बसून दिवसभर धूम्रपान करताना आढळतात. त्याकडे यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जाते. पोलिसांचे वाहन दिसताच धूम्रपान करणारे सावध होतात. तसेच काही ठिकाणी धूम्रपानासाठी आडोसा तयार केल्याने तेथेही धूम्रपान करणाऱ्यांची गर्दी दिसते. विशेषत: शैक्षणिक संस्थांच्या परिसरालगत ही दुकाने फोफावल्याचे चित्र आहे.

हेही वाचा :

The post Nashik News : धूर सोडणाऱ्यांना'कोटपा'चा दणका appeared first on पुढारी.