Nashik News : प्रदूषणमुक्त नाशिकची थट्टा!

प्रदूषणमुक्त नाशिकची थंटा

नाशिक : आसिफ सय्यद

‘स्वच्छ, सुंदर, हरित नाशिक’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या महापालिकेकडून ‘प्रदूषणमुक्त नाशिक’ची केवळ थट्टा सुरू आहे. शहरातील हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषणाची पातळी मोजून आवश्यक उपाययोजना करण्यासाठी पर्यावरण अहवाल तयार करून उपाययोजनांची अंमलबजावणी बंधनकारक आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून पर्यावरण अहवालच तयार केला गेला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दुसरीकडे शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्राच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती कार्यक्रमांतर्गत मिळालेला काेट्यवधींचा निधी हा माॅडेल रोड, वाहतूक बेटे, दुभाजक सुशोभीकरणावर खर्च केला जात असल्याने शहराच्या पर्यावरणाप्रती महापालिका गंभीर नसल्याचे दिसत आहे.

संबधित बातम्या :

महापालिका कायद्यातील कलम ६७ अ नुसार महापालिकेने दरवर्षी ३१ जुलैच्या आत शहरातील पर्यावरण अहवाल तयार करून त्याला महासभेची मंजुरी घेतल्यानंतर हा पर्यावरण स्थितिदर्शक अहवाल केंद्र व राज्य शासनाच्या पर्यावरण विभागास सादर करणे आवश्यक आहे. मात्र महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून शासनाचे निर्देश पायदळी तुडवले जात आहेत. महापालिकेने गेल्या तीन वर्षांपासून पर्यावरण स्थितिदर्शक अहवालच तयार केलेला नाही. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाकडून प्रदूषणमुक्तीच्या नावाखाली कोट्यवधींचा निधी महापालिकेला दिला जात असला, तरी नाशिककरांवर मात्र प्रदूषित वातावरणातच राहण्याची नामुश्की ओढवली आहे. कायद्यातील तरतुदींनुसार पर्यावरण स्थितिदर्शक अहवाल दरवर्षी तयार करणे अपेक्षित असताना, महापालिकेच्या माध्यमातून सद्यस्थितीत २०२१-२२ या वर्षाचा अहवाल तयार केला जात आहे. या अहवालासाठी महापालिकेने खासगी एजन्सी नियुक्त केली आहे. दोन वर्षांपूर्वीच्या अहवालाचे काम आता सुरू असेल, तर या वर्षीचा पर्यावरण अहवाल कधी तयार होणार? सद्यस्थितीतील विविध पातळ्यांवरील प्रदूषणाची पातळी कशी मोजली जाणार? आणि विलंबाने तयार होणाऱ्या या पर्यावरण स्थितिदर्शक अहवालाची अंमलबजावणी कधी व कशी होणार, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाले आहेत. आता प्रशासक तथा आयुक्तांनीच या प्रकरणात लक्ष घालण्याची गरज असून, पर्यावरण विभागातील अधिकाऱ्यांना यासंदर्भात कडक शब्दांत निर्देश देण्याची वेळ आली आहे.

स्वच्छ हवेसाठीचा निधी रस्ते, वाहतूक बेट, दुभाजकांवर

हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र शासनाकडून देशभरात राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती कार्यक्रम (एन कॅप) राबविला जात आहे. यासाठी नाशिकचीही निवड करण्यात आहे. त्यासाठी महापालिकेला कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला आहे. यातून सिटीलिंकसाठी ५० इलेक्ट्रिक बसेस खरेदीची योजना होती. परंतु नियोजनशून्य कारभारामुळे बस खरेदीच्या निविदाप्रक्रियेला विलंब झाला. परिणामी इलेक्ट्रिक बस खरेदीच रद्द करण्याची नामुश्की प्रशासनावर ओढवली. आता हा निधी शासनाकडे परत जाऊ नये, यासाठी त्यातून त्र्यंबकरोड मॉडेलरोड म्हणून विकसित करण्यासाठी खर्च केला जाणार आहे. या रस्त्यावरील दुभाजक, वाहतूक बेटांचे सुशोभीकरण, सायकल ट्रॅक, फूटपाथनिर्मितीसाठी १४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्याशिवाय जलतरण तलावांच्या ठिकाणी सोलर पॅनल बसविण्यात येणार आहेत.

धूलिकणांमुळे हवेचे प्रदूषण

सुदैवाने नाशिक शहरातील हवेची गुणवत्ता चांगली असली, तरी गेल्या काही वर्षांत वाढलेली वाहनांची संख्या, सुरू असलेली बांधकामे यामुळे हवेतील प्रदूषण, प्रामुख्याने धुलिकणांची संख्या वाढली आहे. शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी महापालिकेने प्रदूषकांची तपासणी करणे व नियमित हवेची गुणवत्ता देखरेख ठेवणे आवश्यक आहे.

गोदावरीतील पाणी पिण्यालायक नाही…

नाशिकमधील मलनिस्सारण केंद्रे जुन्या ३० बीओडी मानकांनुसार तयार झालेली आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नव्या मानकांनुसार मलनिस्सारण केंद्रातून नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या प्रक्रियायुक्त सांडपाण्याचा बीओडी १० पेक्षा कमी असणे बंधनकारक आहे. त्यामुळे मलनिस्सारण केंद्रे अस्तित्वात असली, तरी गोदापात्रातील पाणी पिण्यायोग्य नाही, हे महापालिकेने यापूर्वी तयार गेलेल्या पर्यावरण स्थितिदर्शक अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. गेल्या तीन वर्षांपासून पर्यावरण अहवाल तयार झालेला नसल्यामुळे नदीपात्रातील पाण्यासंदर्भात उपाययोजना कशा करणार हा प्रश्न आहे.

ध्वनिपातळीने ओलांडली मर्यादा

नाशिक शहरातील दणदणाट, गोंगाट सातत्याने वाढत असल्याने ध्वनी प्रदूषणाने धोकेदायक पातळी गाठली आहे. निवासी, औद्योगिक, व्यापारी आणि शांतता क्षेत्रातील ध्वनी पातळी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या मानक मर्यादेपेक्षा अधिक आहे. औद्योगीकरण आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे ध्वनी प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे बहिरेपणा, रक्तदाब वाढणे, एकाग्रतेचा अभाव, चिडचिड, मानसिक आणि शारीरिक असंतुलन यासारखे आजार नाशिककरांना जडत आहेत. महापालिकेसह संबंधित यंत्रणांनी त्यावर तातडीने उपाययाेजना करणे गरजेचे आहे.

हेही वाचा :

The post Nashik News : प्रदूषणमुक्त नाशिकची थट्टा! appeared first on पुढारी.