नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; ऐन निवडणुकांच्या तोंडावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शहराध्यक्ष बदलत ‘मास्टरस्ट्रोक’ मारण्याचा प्रयत्न केला असला तरी, या निवडीमुळे पक्षांतर्गत गटबाजी आणखीनच उफाळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नव्या शहराध्यक्षाच्या निवडीमुळे पक्षात कुरबुर वाढली असून, अनेकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. अशात नव्या शहराध्यक्षांसमोर पक्षांतर्गत गटबाजी रोखण्याबरोबरच कार्यकर्ते आणि नेत्यांना एकत्रित आणण्याचे मोठे आव्हान असणार आहे. (Nashik News)
संबधित बातम्या :
- Navratri 2023 : शिवरायांची मोहरांची माळ वाढवतेय तुळजाभवानीच्या खजिन्याचे ऐश्वर्य
- Nashik News : आयटी पार्कसाठी राजूर बहूलात शंभर एकर जागा आरक्षित
राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या नाशिकमध्ये मनसेला २०१४ नंतर चांगलीच उतरती कळा लागली. मनसेच्या तीन पैकी दोन माजी आमदारांनी व एका दिवंगत आमदारांच्या वारसांनी इतर पक्षात घरोबा केला असून, पक्षाच्या पहिल्या-वहिल्या महापौरांने देखील शिवबंधन बांधले आहे. याशिवाय इतर पदाधिकाऱ्यांनी मनसेची साथ सोडल्याने, बोटावर मोजण्याइतपत नेते अन् पदाधिकारी सध्या पक्षात आहेत. त्यातील काही कार्यरत आहेत, तर काहींनी अलिप्ततेचे धोरण स्विकारले आहे. जे कार्यरत आहेत त्यांच्यात देखील आपआपसात मतभेद आहेत. त्यातच नव्या शहराध्यक्षांची निवड करून अंतर्गत कलह क्षमण्याएेवजी आणखीनच भडकण्याची शक्यता आहे. कारण या निवडीवरून पक्षात ‘कही खूशी, कही गम’ असे वातावरण असल्याने, सर्वांना एकत्रित आणण्याचे मोठे आव्हान नव्या शहराध्यक्षांसमोर असणार आहे. मनसे आगामी लोकसभा निवडणुकीत आपला उमेदवार रिंगणात उतरविणार असल्याने नेत्यांसह कार्यकर्त्यांची मोठी फळीच उमेदवाराच्या मागे उभी करावी लागणार आहे. हे सर्व दिव्य शहराध्यक्षांनाच पार पाडावे लागणार असल्याने, त्यांच्यासमोर मोठे आव्हान असेल हे निश्चित.
दरम्यान, माजी शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी गेल्या एप्रिल महिन्यातच शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा देतांना त्यांनी कौटुंबिक कारण पुढे केले असले तरी, अंतर्गत गटबाजी हेच त्यांच्या राजीनाम्यामागील प्रमुख कारण होते. आता दातीर यांना शहराध्यक्षपदावरून हटवून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविले जाणार असल्याने, ही गटबाजी रोखण्याचे मोठे दिव्य आजी-माजी शहराध्यक्षांसमोर असणार आहे.
पक्षाची आर्थिक घडी विस्कटली
स्थानिक स्तरावर पक्षाची आर्थिक घडीही विस्कटल्याचे बोलले जात आहे. पक्ष कार्यालयातील लॅण्डलाइनचे कनेक्शन बिल न भरल्यामुळे कापण्यात आले आहे. तसेच टीव्हीचा रिचार्ज केला जात नसल्याने गेल्या कित्येक दिवसांपासून टीव्ही बंद स्थितीत आहे. पक्ष कार्यालयातील कर्मचारी देखील पगारांअभावी येत नसल्याची बाब समोर येत आहे. याशिवाय घरपट्टी भरली नसल्याने महापालिकेकडून पक्ष कार्यालयासमोर ढोल वाजविले जाणार होते. मात्र, काही पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेवून ढोल वाजविण्यास मनाई केली होती, असे देखील सूत्रांनी सांगितले आहे.
हेही वाचा :
The post Nashik News : मनसे शहराध्यक्षांसमोर पक्षांतर्गत गटबाजीचे आव्हान appeared first on पुढारी.