
नाशिक : पुढारी वृत्तसेवा; ठेकेदार आणि स्मार्ट सिटी कंपनीतील वादामुळे स्मार्ट पार्किंग न्यायालयाच्या दारी पोहोचल्यामुळे शहरातील वाहनतळांचा वाद कायम राहिला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी स्मार्ट पार्किंगची व्यवस्था स्वत:च हाती घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महिला बचतगटांच्या माध्यमातून शहरातील २० स्मार्ट पार्किंग स्थळे चालविण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन असून, या माध्यमातून नागरिकांना पार्किंगची सुविधा, महापालिकेला महसूल आणि बचतगटांतील महिलांना रोजगाराची संधीही उपलब्ध होऊ शकणार आहे.
शहरातील गंभीर झालेली वाहन पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीने पीपीपी तत्त्वावर शहरातील ३३ ठिकाणी स्मार्ट पार्किंगची उभारणी केली. यासाठी ट्रायजेन टेक्नोलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला काम देण्यात आले होते. कोरोनामुळे स्मार्ट पार्किंग सुरू होण्यापूर्वीच बंद पडले. त्यामुळे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करत मक्तेदार कंपनीने महापालिकेला दरवर्षी दिल्या जाणाऱ्या १७ लाखांच्या रॉयल्टीत सूट देण्याची मागणी केली होती. तसेच दुचाकीसाठी प्रतितास ५ ऐवजी १५, तर चारचाकीसाठी प्रतितास १० ऐवजी ३० रुपये शुल्कवाढीसह तीन वर्षांची मुदतवाढ मागितली होती. परंतु महापालिकेने या शुल्कवाढीला नकार देत मक्तेदार कंपनीचा ठेकाच रद्द केल्यामुळे हा वाद आता न्यायालयात पोहोचला आहे. दरम्यान आता महापालिकेने पुढाकार घेऊन पार्किंगचा प्रश्न तात्पुरत्या स्वरूपात निकाली काढण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या दालनात शुक्रवारी (दि. ३) प्राथमिक बैठक झाली. त्यात महापालिकेच्या माध्यमातून स्मार्ट पार्किंग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. महिला बचतगटांच्या माध्यमातून हे पार्किंग चालविण्याचा प्रशासनाचा विचार असून, या माध्यमातून मनपाला महसूल तसेच बचतगटातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकणार आहे.
शहरातील पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून स्मार्ट पार्किंग चालवण्याबाबत प्राथमिक बैठक झाली. बचतगटांच्या माध्यमातून पार्किंग शुल्क आकारण्याचा विचार असून, या माध्यमातून महापालिकेला महसूल व बचतगटातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. तसेच वाहन पार्किंगचा मूलभूत प्रश्नही निकाली निघेल.
– प्रदीप चौधरी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.
या ठिकाणी होणार पार्किंग (वाहनांची क्षमता) –
शरणपूर रोड, कुलकर्णी गार्डन २६
कॅनडा कॉर्नर, बीएसएनएल ऑफिस ६६
ज्योती स्टोअर्स, गंगापूर नाका २४०
प्रमोद महाजन उद्यान, गंगापूर रोड ८३
गंगापूर नाका ते जेहान सर्कल ५९३
जेहान सर्कल ते गुरुजी रुग्णालय १६५
जेहान सर्कल ते एबीबी सर्कल ७८७
गुरुजी रुग्णालय ते पाइपलाइन रोड ७९
मोडक पॉइंट ते खडकाळी रोड ७८
थत्तेनगर १६४
शरद पेट्रोलिअम ते वेस्टसाइड २१७
कॅनडा कॉर्नर ते विसे मळा ११६
शालिमार ते नेहरू गार्डन १०५
हेही वाचा :
- Maratha Reservation | मराठा-कुणबी प्रमाणपत्रासाठी निकष काय?, नवीन जीआर नेमकं काय म्हटलंय?
- Pune Bhide wada : भिडेवाड्यासाठी मोबदला जागामालकालाच मिळणार
- Pune News : पुणेकर मुलीचे डच भाषेत पाठ्यपुस्तक
The post Nashik News : महापालिका स्वत:च चालविणार स्मार्ट पार्किंग appeared first on पुढारी.