नाशिक : पुढारी वृत्तसेवा- इगतपुरी तालुक्यातील मोडाळे आणि कुशेगाव येथे होत असलेल्या विविध कार्यक्रमांसाठी राज्यपाल हजेरी लावणार आहेत. ‘विकसित भारत संकल्प यात्रे’तील विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात येणार आहे. मंगळवारी (दि. २१) होत असलेल्या या कार्यक्रमाच्या तयारीसाठी जिल्हा परिषदतर्फे जोरदार तयारी सुरू आहे. या दौऱ्यात राज्यपाल बैस शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याने या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
गेल्या आठवड्यात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ उपक्रमाला सुरुवात झाली. संकल्प यात्रा जिल्ह्यातील सहा तालुक्यांत १४ ते २२ नोव्हेंबरदरम्यान सुरू झाली असून, यात्रेचा प्रारंभ नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यातील ननाशी गावात पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झाला. मात्र, ज्या जिल्ह्यांत यात्रेचा रथ फिरणार आहे, त्या जिल्ह्यांना राज्यपाल भेट देणार आहेत. त्यानुसार राज्यपाल बैस इगतपुरी तालुक्यातील कुशेगाव व मोडाळे ग्रामपंचायतींना भेट देणार आहेत. सध्या महापालिका आणि जिल्हा परिषदांवर प्रशासकीय राज आहे. त्यामुळे योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचतोय किंवा नाही याबाबतची माहिती ते घेणार आहेत. या दौऱ्याची जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेकडून तयारी सुरू झाली आहे.
इगतपुरी तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांची बदली झालेली आहे. त्यामुळे हे पद रिक्त होते. राज्यपाल दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील यांच्याकडे पदभार सोपविला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर पाटील यांनी संबंधित गावांमध्ये जात बैठका घेत तयारी सुरू केली आहे. या दौऱ्यात राज्यपाल बैस हे कुशेगाव येथे नॅनो युरियाचे प्रात्यक्षिक, मोडाळे गावात बचत गटाच्या महिलांनी बनविलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाला भेट देणार आहेत. त्यानंतर विविध योजनांची माहिती देणाऱ्या स्टॉलला भेट देणार आहेत. यानंतर लााभार्थ्यांना सायकलींचे वाटप राज्यपालांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यपाल बैस, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होईल.
———–
The post Nashik News : राज्यपाल बैस उद्या नाशकात appeared first on पुढारी.