झपाट्याने विकसित होत असलेल्या नाशिक शहरात गेल्या वर्षभरात ९१ हजार ७८९, तर जिल्हाभरात २१ लाख ३२ हजार नवीन वाहने नोव्हेंबर अखेरपर्यंत रस्त्यावर आली आहेत. शहराची लोकसंख्या २२ लाखांच्या आसपास आहे, त्यामुळे आता घरात सदस्यपर वाहन दिसून येत आहे. नोकरदार पती-पत्नी आणि कॉलेजला जाण्यासाठी आता मुलांना स्वतंत्र वाहन घरच्यांकडून मिळत आहे. दुचाकी खरेदी करणे आता फार अवघड न राहिल्याने ‘ईएमआय’ सुविधेवर सर्वसामान्य नागरिक सहज दुचाकी खरेदी करू लागला आहे. घराच्या पार्किंगमध्ये एकच गाडी असे चित्र फार क्वचित बघायला मिळत आहे.
माेटरसायकल, स्कूटर, मोपेड सोय म्हणून नाही, तर गरज म्हणून वापरली जाते. कुठे गावाला, पर्यटनाला जायचे असल्यास स्वत:चे चारचाकी वाहन हवे म्हणून चारचाकी घेण्याला पसंती दिली जाते, तर तरुणांना महाविद्यालयात जाण्यासाठी पालक पब्लिक ट्रान्स्पोर्टपेक्षा वाहन खरेदी करण्यास प्राधान्य देतात. बऱ्याचदा घराजवळ पार्किंग नसल्याने अनेकांना परवानगी घेऊन इतरांच्या जागेवर गाडी पार्किंग करावी लागत आहे. शहरात रस्ते अरुंद आणि वाहनांची संख्या वाढत असल्याने प्रदूषण, ट्राफिक आणि पार्किंगची मोठी समस्या भविष्यात निर्माण होणार आहे.
दरम्यान, ट्राफिकचे नियम न पाळणे, सिग्नल मोडणे, हेल्मेट न वापरणे या नियमांकडे नाशिककर सर्रास दुर्लक्ष करतात. सिग्नलवर काही सेकंद थांबू न शकणारी मंडळी अपघाताला स्वत:हून निमंत्रण देतात. हॉर्न वाजवला, कट मारला, धक्का लागला यावरून किरकोळ वाद ते हाणामारीपर्यंतच्या घटना दररोज घडतात
तरुणाई दुचाकीवर स्वार
कधी काळी महाविद्यालयांची पार्किंग सायकलींनी भरलेली असे परंतु, आता महाविद्यालयीन विद्यार्थी सरसकट दुचाकी घेऊन येतात. घरापासून महाविद्यालय दूर असल्याने बस किंवा रिक्षापेक्षा दुचाकी वापरणे सोयीचे असल्याने पालकही आता मुलांना खासकरून बुलेट, मोपेड अशी वाहने खरेदी करून देतात. सायकल आता केवळ हेल्थ कॉन्शियस असणारी मंडळी वापरतात.
दि. ३१ मार्च ते ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी झालेली वाहने
मोटरसायकल : १२,४०,१०५
स्कूटर : २,३१,९८२
मोपेड : ६६,३१३
मोटर कार : २,७५,८८९
जीप : ३०,५१६
इतर : २,८८,२३०
एकूण : २१,३२,९३०
The post Nashik News : शहरात वर्षभरात ९१ हजार नवीन वाहने रस्त्यावर appeared first on पुढारी.