Nashik News : सावरगाव शिवारात हिंस्त्र प्राण्यांचा धुमाकूळ

Nashik News

न्यायडोंगरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ; नांदगाव तालुक्यातील सावरगाव परिसरात बिबट्यासदृश प्राण्याने गेल्या चार-पाच दिवसांपासून धुमाकूळ घातला असून, दोन-तीन पाळीव प्राणी गंभीर जखमी केले. तर एका वासराचा फडशा पाडल्याने सावरगाव परिसरात प्रचंड दहशत निर्माण होऊन पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (Nashik News)

सावरगाव येथील वसंत नामदेव शेलार यांचा गोऱ्हा मृतावस्थेत मिळून आल्याने या बाबतची खबर वनविaभागाला देताच वन परिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मगन राठोड, वनरक्षक सोनवणे तसेच वेहेळगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुरवसे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला. गोऱ्ह्याचे शवविच्छेदन करण्यात आले. जखमी जनावरे व मृत जनावरांच्या हल्ल्याचे व जखमांचे निरीक्षण करता हा बिबट्याचा हल्ला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. यंदा नांदगाव तालुक्यात भयानक दुष्काळ असून, सर्वत्र पिण्याच्या पाण्यासह जनावरांनाही तीव्र झळा पोहोचू लागल्याने हिंस्र प्राणी पाण्याच्या शोधात भटकंती करत गावाकडे येत असून, गावालगत खळ्यात मळ्यात बांधलेल्या पाळीव जनावरांवर हल्ला होण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. यामुळे या हिंसक प्राण्यांचा त्वरित बंदोबस्ताची मागणी पशुपालकांकडून होत आहे. दररोज पडणाऱ्या कडक उन्हामुळे जमिनी अत्यंत कडक होऊन आजूबाजूस प्राण्यांच्या पावलांचे ठसे उमटलेले दिसून आले असल्याने नेमका कोणत्या प्राण्याने हल्ला केला असावा याचा अंदाज व्यक्त करणे अवघड झाले आहे.

सावरगाव येथील घटना गंभीर असून, याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. पशुपालकांना सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच वेळ पडल्यास पिंजऱ्याची व्यवस्था करू. ज्या पशुपालकांचे नुकसान झाले आहे त्यांना शासनस्तरावरून नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविणार आहे.

– सागर ढोले, वनपरिक्षेत्र अधिकारी, नांदगाव

हेही वाचा :

The post Nashik News : सावरगाव शिवारात हिंस्त्र प्राण्यांचा धुमाकूळ appeared first on पुढारी.