मुसळधार पाऊस

इगतपुरी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
पावसाचा तालुका म्हणून ओळखल्या जाणार्‍या इगतपुरीत यंदा वरुणराजाने धुवाधार बॅटिंग करत गत 20 ते 22 वर्षांतील विक्रम मोडीत काढला आहे. यंदा अवघ्या दोन महिन्यांत तालुक्यात सरासरीच्या दीड पट, तर 20 वर्षांतील प्रथमच 4500 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. परिणामी, तालुक्यातील सर्वच धरणे तुडुंब भरली असून, डोंगर-दर्‍यांतून धबधबे खळखळून वाहत आहेत.

igatpuri Rain,www.pudhari.news
मुंबई-आग्रा महामार्गावरील कसारा घाटात खळाळून वाहणारा धबधबा.

इगतपुरी या घाटमाथ्यावरच्या तालुक्यात यंदा हंगामातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. या भागात सुरुवातीपासूनच पावसाचा जोर होता. प्रारंभीच्या पहिल्या टप्प्यात जोरदार बरसल्यानंतरही रिपरिप कायम ठेवली. आता परतीच्या पावसानेही इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात विक्रम करत सर्वत्र पाणीच पाणी केले. मात्र, यामुळे भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस असण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता. मात्र, उशिरा सुरू झालेल्या पावसाने यंदा तालुक्याला जोरदार तडाखा देत विक्रम केला आहे. तालुक्यातील छोटी-मोठी सर्वच धरणे तुडुंब भरली आहेत. पावसामुळे तालुक्यातील भातशेती संपूर्ण पाण्याखाली गेली आहे. पूर्व पट्ट्यातील भातपिके तर पाण्यात वाहून गेली आहेत. त्यामुळे भातपिकात पाणी की, पाण्यात भातपीक अशी स्थिती या भागात झाली. आता पुन्हा चार दिवसांपासून परतीच्या पावसाचा जोर सुरू असल्याने भातपिकाची मोठी हानी झाली आहे.

तालुक्यातील सर्वच धरणे ओव्हरफ्लो
यंदा अडीच महिन्यांपासून धरणे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागली आहेत. जवळपास सर्वच धरणांतून काही दिवसांपासून विसर्गही सुरू आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून परतीच्या पावसाने हाहाकार केला आहे. पूर्व भागात तर शेतांसह घराघरांतही पाणी शिरल्याच्या घटना गाव-पाड्यावर घडल्या आहेत. दारणा, काडवा, मुकणे, भाम, भावली, वाकी आदी धरणे तसेच ल. पा. बंधारे यातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा :

The post Nashik Rain : इगतपुरीत वरुणराजाची धुवाधार बॅटिंग, 20 वर्षांतील विक्रमी पाऊस appeared first on पुढारी.