Site icon

Nashik Shirdi Accident : अंबरनाथच्या मोरवली गावावर शोककळा; कुणी गमावला पोटचा गोळा, कुणाचे हरपले माता -पित्यांचे छत्र

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा

सिन्नर-शिर्डी महामार्गावर पाथरे गावानजीक खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात (Nashik Shirdi Accident) झाला. यात 10 जणांचा मृत्यू झाला, तर जवळपास 24  जण गंभीर जखमी झाले. अंबरनाथ परिसरातील लक्ष्मीनारायण प्रिंटिंग अ‍ॅण्ड पॅकेजिंगचे मालक कंपनीत काम करणारे कामगार आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी दरवर्षी शिर्डी दर्शन यात्रा काढतात. यावर्षी त्यांनी 12 खासगी आराम बस व तीन बोलरो जीपद्वारे कामगार व त्यांच्या नातेवाईकांना शिर्डी दर्शनाची सोय केली होती. अंबरनाथ परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून शिर्डी येथे रवाना झाल्या होत्या. दरम्यान, त्यातील एका बसचा पाथरे गावाजवळ पहाटे 6 ते 6.30च्या दरम्यान अपघात झाला. शिर्डीला पोहोचण्यासाठी अर्धा तासांचे अंतर असतानाच हा अपघात झाला. मृतांमध्ये 4 महिला, 2 पुरुष, 1 लहान मुलगा व तीन लहान मुलींचा समावेश आहे.

अपघातामुळं (Nashik Shirdi Accident) एका नऊ वर्षांच्या चिमुकलीने आपल्या आई-वडिलांना गमावले आहे. निधी उबाळे असे या चिमुकलीचे नाव आहे. निधी ही तिचे आई-वडील व काका – काकूसह शिर्डी येथे जात होती. तिचे काका-काकू वेगळ्या बसमध्ये होते. ती तिच्या आई-वडिलांसह अपघातग्रस्त बसमध्ये होती. या अपघाताने तिचे आई-वडिल हिरावून घेतले आहेत. निधी अपघातात गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. इकडे पहाटे अपघात झाला त्यादरम्यान, निधीचे काका-काकू शिर्डी येथे पोहोचले होते.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने शिर्डी सोडली व रुग्णालयात धाव घेतली. तिथे गेल्यावर त्यांनानिधीच्या आई-वडिलांचा मृत्यू झाल्याचे समजले. रुग्णालयात दाखल असलेल्या मुलीने आपली आई वैशाली आणि वडील नरेश उबाळे यांना या अपघातात गमावले. जखमी अवस्थेतील चिमुकली आईवडिलांची विचारणा करीत होती, तेव्हा नातेवाइकांना अश्रू आवरणे कठीण झाले होते.

क्रीडापटू दिक्षाचे स्वप्न राहिले अधुरे


या अपघातात मृत्युमुखी पडलेली दीक्षा संतोष गोंधळी ही कबड्डी आणि बेसबॉल क्रीडा प्रकारात पारंगत होती. खेळात लौकिक करण्याचे स्वप्न होते. पालकमंत्री भुसे यांनी दवाखान्यात जखमींना धीर दिला. त्यावेळी दिक्षाचे वडील तिच्या स्वप्नाबाबत सांगत होते. दिक्षाची आठवण सांगताना त्यांचे अश्रू थांबत नव्हते. तिला आता नाशिक येथे प्रवेश घेऊन खेळात करिअर करायचे होते, असेही ते म्हणाले. दिक्षाची आई या अपघातात गंभीर जखमी झाली आहे.

हेही वाचा : 

The post Nashik Shirdi Accident : अंबरनाथच्या मोरवली गावावर शोककळा; कुणी गमावला पोटचा गोळा, कुणाचे हरपले माता -पित्यांचे छत्र appeared first on पुढारी.

Exit mobile version