Nashik weather : निफाडच्या पाऱ्यात किंचित वाढ, नाशिकमध्ये थंडीचा कडाका कायम

थंडी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

निफाडच्या पाऱ्यात गुरुवारी (दि. १२) किंचित वाढ होऊन तो ५.५ अंशांवर स्थिरावला असला, तरी तालुक्यात गारठा कायम आहे. नाशिकचा पारा ९.२ अंशांवर असून, हवेतील गारव्यामुळे नाशिककरांना हुडहुडी भरली आहे.

हिमालयात सुरू असलेली बर्फवृष्टी तसेच उत्तरेकडील अनेक राज्यांत किमान तापमानात झालेल्या घसरणीचा परिणाम जिल्ह्याच्या हवामानावर झाला आहे. गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानाच्या पाऱ्यातील चढ-उतार कायम आहे. निफाडमधील कुंदेवाडीच्या कृषी संशोधन केंद्रात ५.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. तालुक्यात सध्या द्राक्षबागांचा हंगाम सुरू होणार आहे. शेकडो एकरांवरील द्राक्षबागा फुलोऱ्याच्या अवस्थेत असून, द्राक्षमणी परिपक्व होण्याच्या स्थितीत आहेत. मात्र, थंडीचा कडाका वाढल्याने द्राक्षमण्यांतील साखर उतरण्याच्या प्रक्रियेला फटका बसण्याच्या शक्यतेने शेतकरी धास्तावले आहेत. नाशिकचा पारा १० अंशांखाली असून, हवेत दिवसभर गारवा जाणवत होता. उर्वरित जिल्ह्यातही तापमानात बदल कायम आहे. पुढील काही दिवस जिल्ह्यात थंडीचा जोर कायम राहील, असा अंदाज आहे.

हेही वाचा : 

The post Nashik weather : निफाडच्या पाऱ्यात किंचित वाढ, नाशिकमध्ये थंडीचा कडाका कायम appeared first on पुढारी.