Nashik ZP : आचारसंहितेमुळे पदभरती एक महिना लांबणीवर

जिल्हा परिषद नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सरळ सेवेने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणारी जिल्हा परिषदेची पदभरती प्रक्रिया पदवीधर निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे एक महिना लांबणीवर पडणार आहे.

सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याबाबत जिल्हा परिषदेने रिक्त जागांचा अंतिम आराखडा राज्य शासनाकडे पाठवला होता. राज्य शासनाने नुकत्याच घेतलेल्या शासन निर्णयामुळे पदभरती जिल्हा निवड मंडळाने करावयाची असल्याने पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, जिल्ह्यात पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली असल्याने पदभरतीबाबत सर्व कामे एक महिना लांबणीवर पडणार आहेत, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी पिंगळे यांनी दिली.

गेल्याच महिन्यात झालेल्या शासन निर्णयानुसार ३१ मेपर्यंत रिक्त जागांबाबत आढावा, जाहिरात, परीक्षा आणि निकाल घोषित करून निवड झालेल्या उमेदवारांना पदस्थापना देण्यात याव्यात, असे म्हटले होते. याबाबतचा कालबद्ध कार्यक्रमच जाहीर करण्यात आलेला होता. राज्य शासनाकडून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 4 मे 2020 च्या शासननिर्णयान्वये राज्यात भरतीप्रकिया बंद करण्यात आली. मात्र, आता सर्व सुरळीत होत असताना आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अंदाजे ७५ हजार सरळसेवा कोट्यातील पदे शासन भरणार आहे. ही पदे भरण्याचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होण्यासाठी केवळ स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील पदभरतीसाठी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. याबाबत ३१ ऑक्टोबर रोजी ‌शासन निर्णयदेखील पारित करण्यात आला होता. त्यानंतर या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदांना भरती प्रक्रिया राबविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून देण्यात आला आहे.

नाशिक जिल्हा परिषदेमध्ये सद्यस्थितीत २ हजार ७२६ जागा रिक्त आहेत. यामध्ये २ हजार ५३८ जागा या वर्ग ३ च्या आहेत. या जागांसाठी ही भरती होण्याची शक्यता आहे. यासाठी ३१ जानेवारीपर्यंत रिक्त जागांचा तपशील, संवर्गानुसार आरक्षण, पदभरतीसाठी कंपनी निश्चित करायची होती. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात येणार होती. मात्र, आता आचारसंहितेमुळे ही सर्व प्रक्रिया किमान एक महिना लांबणीवर पडणार आहे. तसेच याबाबतच्या नवीन सूचनादेखील देण्यात येणार आहेत.

हेही वाचा : 

The post Nashik ZP : आचारसंहितेमुळे पदभरती एक महिना लांबणीवर appeared first on पुढारी.