Nashik ZP : कामांची स्थगिती उठविण्यासाठी पालकमंत्र्यांचे आस्ते कदम

जिल्हा परिषद नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विकासकामांना स्थगिती देण्यात आली होती. ती टप्प्याटप्प्याने उठविली जात असली, तरी जिल्हा परिषदेच्या निधीबाबत पालकमंत्र्यांनी आस्ते कदम हेच धोरण अवलंबलेले दिसून येत आहे. गत आठवड्यात झालेल्या आढावा बैठकीत विकासकामे आणि निधी नियोजनाबाबत तालुकानिहाय आकडेवारी नसल्याने अद्याप स्थगिती असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, राज्यामध्ये जून महिन्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर ४ जुलैला जिल्हा वार्षिक योजनेतून २०२२-२३ या वर्षातील नियोजनास स्थगिती देताना, शासनाने १ एप्रिल २०२१ नंतर मंजूर झालेल्या पण कार्यारंभ आदेश न दिलेल्या कामांना स्थगिती दिली होती. त्यानंतर राज्यात पालकमंत्र्यांच्या नियुक्तीसाठी सप्टेंबर महिना उजाडला. पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर २०२२-२३ या आर्थिक वर्षातील जिल्हा वार्षिक योजनेतील निधीवरील स्थगिती उठेल, असे अनेकांना वाटले होते.

पालकमंत्री दादा भुसे यांनी १० ऑक्टोबरला घेतलेल्या नियोजन समितीच्या बैठकीत काही आमदारांनी स्थगिती उठविण्याची मागणी केल्यानंतर ना. भुसे यांनी कामांचे असमान वाटप झाले असून, या कामांची तपासणी आणि निधी वितरणाचा आढावा घेऊन मगच स्थगिती उठविली जाईल, असे जाहीर केल्याने ठेकेदारांसह इतर लोकप्रतिनिधी यांना धक्काच बसला होता. जिल्ह्यात साधारणपणे ११८ पैकी ४९ कोटींच्या कामांची नव्या पालकमंत्र्यांनी स्थगिती उठविली आहे. त्यामुळे सुमारे ६५ ते ६७ कोटींच्या जुन्या कामांच्या मंजुरीसाठी अजून किती वाट बघावी लागेल, असा प्रश्न जिल्हा परिषदेत उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा :

The post Nashik ZP : कामांची स्थगिती उठविण्यासाठी पालकमंत्र्यांचे आस्ते कदम appeared first on पुढारी.