Nashik ZP : पदाधिकार्‍यांना निवडणुकीची दारे बंद, गट आरक्षणात मातब्बरांना धक्के

नाशिक जिल्हा परिषद,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीमध्ये सर्वसाधारण तालुक्यातील अनेक गटांमध्ये आरक्षण पडल्यामुळे जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य, पदाधिकारी यांची संधी हुकली आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, भाजप गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे आदींचा समावेश आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जाती, जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिलांसाठीचे आरक्षण हे चक्राकार पद्धतीने आहे. यामुळे प्रत्येक निवडणुकीत वेगळे आरक्षण असते. यामुळे विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता फार कमी असते. पूर्वी नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण असे सलगपणे आल्यास विद्यमान सदस्य अथवा त्यांच्या कुटुंबातील महिला यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळत असे. आता नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी केवळ तीन जागा उरल्या आहेत. तसेच, लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण असल्यामुळे अनुसूचित जमातीसाठी 33 गट आरक्षित असल्यामुळे आता बहुतांश गट दर 10 वर्षांनी अनुसूचित जमातीसाठी आरक्षित होण्याची शक्यता वाढली आहे. त्यात दरम्यानच्या काळात पडणार्‍या आरक्षणांमुळे ग्रामीण भागातील नेतृत्वाला पुन्हा निवडणूक लढवण्याची संधी मिळत नाही. यामुळे जिल्हा परिषदेच्या 2017-2022 या काळातील सदस्यांपैकी बहुतेकांना पुन्हा निवडणूक लढवता येणे अवघड झाले आहे.

त्यात प्रामुख्याने बाळासाहेब क्षीरसागर, डॉ. सयाजी गायकवाड, डॉ. आत्माराम कुंभार्डे, नयना गावित, अश्विनी आहेर, किरण थोरे, सिद्धार्थ वनारसे, यशवंत ढिकले आदींची निवडणूक लढविण्याची संधी हुकणार आहे. त्याचवेळी शीतल सांगळे, सुरेखा दराडे, मनीषा पवार, सीमंतिनी कोकाटे, रूपांजली माळेकर, अनिता बोडके (गट बदलून), डी. के. जगताप, महेंद्रकुमार काले, संजय बनकर, संभाजी पवार यांना पुन्हा निवडणूक लढविण्याची संधी मिळणार आहे. त्यात संजय बनकर व संभाजी पवार या दोघांना एकमेकांसमोर निवडणूक लढवावी लागणार आहे.

हेही वाचा :

The post Nashik ZP : पदाधिकार्‍यांना निवडणुकीची दारे बंद, गट आरक्षणात मातब्बरांना धक्के appeared first on पुढारी.