राज्यभर नवरात्रीचा मोठा उत्साह सुरू असतानाच सुरगाण्यासारख्या आदिवासी तालुक्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिकेने प्रबोधनाचा जागर सुरू केला आहे. नवरात्रोत्सवाचे नऊ दिवस पर्यवेक्षिकेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या नऊ अंगवाड्यांच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांच्या मदतीने समाजातील चुकीच्या प्रथांना आळा घालण्यासाठी घरोघरी जाऊन प्रबोधनाचा अनोखा प्रयत्न करत आहेत. यामुळे एका बाजूला जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर चिंताजनक असताना प्रशासनातील स्थानिक पातळीवर कार्यरत अंगणवाडी पर्यवेक्षिकांडून होणारे प्रबोधन कौतुकाचा विषय ठरत आहे.
नवरात्रीनिमित्त गाव-पाड्यांवर घट बसविणे, देवीचा जागर असे धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. यानिमित्ताने समाजातील विविध घटक एकत्र येतात. याचाच सकारात्मक उपयोग करून सुरगाण्यामधील मंगल गायवान या पर्यवेक्षिकेने आपल्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या नऊ अंगणवाडी केंद्रांवरील नऊ अंगणवाडी सेविकांना एकत्र करत प्रत्येक माळीला एक थीम घेतली. त्या माध्यमातून गावातल्या प्रत्येक घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात येत आहे.
पहीली माळ : ‘माझी माती, माझा गाव’ याअंतर्गत गावातील माती कलशात भरून कणसारा माता म्हणजेच नागली कणसाची पूजा केली. कलशामधील मातीमध्ये नागलीचे दाणे मुलांनी पेरले. त्यातून त्यांनी भरडधान्य पोषणासाठी किती महत्त्वाचे आहेत याबद्दल लोकांना सांगितले.
दुसरी माळ : गावामध्ये ग्रामसभा असल्याने ग्रामस्थांना विडा म्हणून नारळ हातात घेऊन बालविवाह बंदी, बेटी बचाव बेटी पढाव, स्त्रीभ्रूण हत्या हा गुन्हा आहे याबाबत शपथ घ्यायला सांगितली. ही शपथ घेऊन आपल्या घरी गर्भवती असेल तर तिची काळजी घेण्यासाठीही जनतेला प्रवृत्त केले.
तिसरी माळ : आपली परंपरा असलेला वासुदेवाला घरोघरी पाठवून घरातील बालकांंना पोषण आहार कसा द्यायचा याबाबत प्रबोधन केले. त्यासोबतच महिला गरोदर असल्यास तिला शासनाच्या मिळणाऱ्या सुविधांची माहिती देण्यात आली.
चौथी माळ : जोगवा.. दारूबंदी, गुटखाबंदी, मोबाइलवरील वाह्यात गेमवर बंदी, गावातील प्लास्टिकबंदी तसेच मिस्त्रीबंदी याबाबत जनजागृती केली. यामध्ये देवीचा जसा जोगवा होतो तसाच समाजप्रबोधनाचा जोगवा मुलांच्या माध्यमातून मागण्यात आला.
पाचवी माळ : नवरात्रीत नऊ रंगांच्या साड्या असतात. त्यापेक्षा या महिलांनी खाद्यपदार्थांचा तिरंगा बनवत घरोघरी जाऊन त्याचे महत्त्व सांगितले. त्यामध्ये केशरी रंग म्हणजे डांगर आणि डाळ, पांढरा रंग म्हणजे तांदूळ आणि फळे, हिरवा रंग म्हणजे पालेभाज्या याद्वारे सर्व पोषण आहाराचे महत्त्व सांगण्यात आले.
सहावी माळ : वारकरी आणि त्याची दिंडी प्रत्येक घरी जाऊन राज्य शासनाचा उपक्रम असलेल्या तरंग सुपोषित महाराष्ट्राचा या माध्यमातून गरोदर मातेने काय काळजी घ्यावी याबाबत जनजागृती केली. या माध्यमातून ८०८०८०९०६३ या क्रमांकावर गरोदर मातेचा समावेश केला.
सातवी माळ : भरडधान्याचे महत्त्व समजावे यासाठी स्थानिक पातळीवरील धान्यापासून थालिपिठे, नागलीचे लाडू तसेच गूळ-शेंगदाण्याचा वापर करून त्याचे मोदक करण्याच्या पद्धती लोकांना सांगितल्या.
आठवी माळ : गेले सात दिवस केलेले उपक्रम नागरिकांना कितपत समजले यासाठी गृहभेटी घेणार आहे. ज्यामध्ये काही अडचणी असल्यास त्या सोडविण्यात येणार आहेत.
दसरा : सीमोल्लंघनानिमित्त पहिल्या माळेला विद्यार्थ्यांनी जे कलश तयार केले होते, त्यामध्ये कसे रोप आले याचे प्रदर्शन होणार आहे. तसेच जे प्लास्टिक, दारूच्या बाटल्या, मिस्त्री, गुटखा असे हानिकारक पदार्थ जमा केले ते सगळे एकत्र करून त्याचे दहन करण्यात येणार आहे.
ही आहेत नऊ केंद्रे
कोकरी, उंबरविहीर, वडमाळ सुरगाणा, फणसपाडा, चुली, तिवसेमाळ, नवापूर, चापापाडा आणि जामुना.
वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही नेहमीच जनजागृती करतो. नवरात्रीनिमित्ताने जनतेमध्ये प्रबोधनाची संधी मिळते. या संधीचा आम्ही पुरेपूर फायदा घेत आहोत. देशाचा विकास करायचा असेल तर त्याची सुरुवात स्वत:पासून करण्यात येत आहे.
– मंगल गायवान, अंगणवाडी पर्यवेक्षिका, सुरगाणा
हेही वाचा :
- इस्त्रायलला ‘स्वसंरक्षणाचा अधिकार’ : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसह मित्र राष्ट्रांचा पुनरुच्चार
- Navratri festival 2023 : आज शस्त्रपूजनाची खंडेनवमी, उद्या शिळा दसरा, जाणून घ्या महत्त्व
The post Navratri 2023 : अंगणवाडी पर्यवेक्षिकेकडून नवरात्रोत्सवात प्रबोधनाचा जागर appeared first on पुढारी.