Onion Price : व्यापारी मालामाल, शेतकरी बेहाल ; तीन रुपये किलोचा कांदा २० रुपये किलोने ग्राहकांच्या माथी

कांदा उत्पादक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दरवर्षीप्रमाणे यंदाही कांद्याने शेतकऱ्यांना रडविले असून, व्यापारी मात्र मालामाल होताना दिसत आहे. शेतकऱ्यांकडून अवघ्या दोन ते तीन रुपये किलोने कांदा खरेदी करून ग्राहकांच्या माथी तो १५ ते २० रुपये किलोने मारला जात असल्याचे शहरात चित्र आहे. शहरातील बहुतांश सर्वच प्रमुख भाजीबाजारात सध्या कांदा २० रुपये किंवा त्यापेक्षा अधिकच्या दराने व्यापाऱ्यांकडून विकला जात आहे. तर दुसरीकडे भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र आहे.

हंगामातील जुना कांदा संपल्याने, सध्या बाजारात नवीन लाल कांदा आला आहे. मात्र, या कांद्याला कवडीमोल भाव असल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्याला अवघा दोन ते तीन रुपये भाव मिळत असल्याने कांद्याचे पीक घेताना लागलेला खर्च वसूल करणेही अवघड झाले आहे. अनेकांनी बँकांचे कर्ज काढून कांद्याचे पीक घेतल्याने, ते फेडायचे कसे असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. दुसरीकडे व्यापारी मात्र, शेतकऱ्यांच्या याच परिस्थितीचा फायदा घेताना दिसत आहे. शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात कांदा खरेदी करून ग्राहकांना अवाच्या सव्वा भावात विकला जात आहे. यातून शेतकऱ्यांची लूट तर ग्राहकांची सर्रास फसवणूक केली जात असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, शहरातील सर्वच उपनगरीय भाजीबाजारातील कांद्याच्या दराचा आढावा घेतला असता, १५ रुपयांपासून ते ३० रुपयांपर्यंतचे दर असल्याचे समोर आले. वास्तविक दरवर्षीच अशी परिस्थिती असून, नेहमीप्रमाणे यंदादेखील राजकारणी मंडळी यावर तोडगा काढण्याचे विधान करीत आहेत. प्रत्यक्षात कोणाकडूनही ठोस कृती होताना दिसत नसल्याने शेतकरी वर्गाकडून संताप व्यक्त केला जात आहे.

सातपूर – २० ते ३५ रु.

पंचवटी – १५ ते २५ रु.

नाशिकरोड – २० ते ३० रु.

सिडको – १५ ते ३० रु.

गंगापूर – २५ ते ३५ रु.

(सर्व दर प्रति किलोमध्ये आहेत)

हेही वाचा :

The post Onion Price : व्यापारी मालामाल, शेतकरी बेहाल ; तीन रुपये किलोचा कांदा २० रुपये किलोने ग्राहकांच्या माथी appeared first on पुढारी.