photos : आदिमायेच्या जयघोष दुमदुमला सप्तश्रृंगीगड; भाविकांत आनंदोत्सवच!

वणी (नाशिक) : शक्तिपिठांपैकी अर्धे स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावरील आदिमायेचे मंदीर भाविकांना दर्शनासाठी खुले झाले. भाविकांअभावी आठ महिन्यांपासून सूनासूना असलेला अवघा सप्तशृंगीगड भाविकांच्या गर्दीने फुलुन तर श्री सप्तशृंगी मातेच्या जयघोषाने प्रफुल्लित गेला आहे.

मंदीराचा गाभारा दिव्यांच्या प्रकाशाने उजळला

दीपावली पाडव्याच्या मुहुर्तावर सोमवारी (ता. 15) पहाटे पाच वाजता आदिमायेचे मंदीर भाविकांना तब्बल आठ महिन्यांनी दर्शनासाठी उघडल्यानंतर 'अंबे मॉ की जय, सप्तशृंगी मातेचे की जय'चा भाविकांनी जयघोष केला. मंदीराच्या पायऱ्या चढत मोठया उत्साहात भाविक आदिमायेच्या आश्वासक मूर्तीसमोर नतमस्तक झाले. देवीच्या काकड आरतीचा मान नाशिकचे भाविक वैभव देवरे व परिवार यांना मिळाला. देवी ट्रस्टच्या वतीने त्यांना शाल, श्रीफळ देण्यात आले. दरम्यान दीपावली पाडव्यानिमित्त सोमवारी (ता. 15) सायंकाळी मंदीराच्या गाभाऱ्यात दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी संपूर्ण देवी मंदीराचा गाभारा दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता.

गुलाबराव पाटील यांची सप्तशृंगी गडावर हजेरी

मंगळवारी (ता. १७) रोजी राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील सप्तशृंगी गडावर हजेरी लावत आदिमायेचरणी नतमस्तक झाले. यावेळी सप्तशृंगीगड न्यासाच्यावतीने ट्रस्टचे विश्वस्त तथा तहसिलदार बंडु कापसे यांनी तर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने गिरीश गवळी, संदीप बेनके, राजेश गवळी आदींनी स्वागत केले. यावेळी गडावरील पाणी पुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी चणकापूर धरणावरुन जलवाहिनी टाकण्यासाठी सर्वेक्षण करण्यात यावा, सप्तशृंगी गडावर वन विभागाने दिलेल्या क्षेत्रात लघु धरण बांधण्यात यावे आदी ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत पाणी पुरवठामंत्री यांच्याकडे केले.

दर्शन घ्या पण नियम पाळून...

श्री भगवती मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी पहाटे ५.०० ते रात्री ९.०० वाजेदरम्यान खुले होणार असून प्रतितासी ३६० भाविकांना (पायरी मार्गे २४० व रोपवे मार्गे १२०) श्री भगवती मंदिरात प्रवेश देण्यात येत आहे. मास्क असल्याशिवाय गडावर प्रवेश नाही. टोल नाक्यावर ग्रामपंचायतीचे कर्मचारी, पहिल्या पायरीवर संस्थानचे कर्मचारी तर रोपवे प्रवेशद्वारावर भाविकांची मास्क तपासणीसह थर्मल स्कॅनिंग करुन सोडण्यात येत आहे. ट्रस्टने महाप्रसादालयाची व्यवस्था तसेच भाविकांसाठी भक्तनिवासाची सुविधाही तुर्त बंदच ठेवण्यात आली आहे. भाविकांना प्रसाद, तीर्थ वाटपास बंदी करण्यात आली आहे. ट्रस्टच्या वतीने ६५ वयोगटावरील जेष्ठ नागरिकांना तसेच १० वर्षाखालील बालकांना मंदीरात जाण्यास बंदी करण्यात आली आहे.