Pink rickshaw : नाशिककरांच्या सेवेत दोन ‘पिंक रिक्षा’ दाखल

पिंक रिक्षा नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील दोन गरजू महिलांना पिंक रिक्षा (Pink rickshaw) वितरित करण्यात आल्या असून त्या नाशिककरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. रोटरीच्या या उपक्रमामुळे खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाला बळकटी मिळाली आहे.

शहरातील महिलांसाठी पिंक रिक्षा (Pink rickshaw) धावू लागल्याने सुरक्षित प्रवासाचा मार्ग अधिक सुखकर झाला आहे. मागील महिन्यातच शहरातील महिला लाभार्थी नीता सुभाष बागुल आणि शोभा लक्ष्मण पवार या दोन गरजू महिलांना रोटरीचे प्रांतपाल डॉ. आनंद झुंजूनूवाला यांच्या हस्ते पिंक रिक्षांचे वितरण करण्यात आले होते. सामाजिक क्षेत्रात गेल्या ७८ वर्षांपासून कार्य करणाऱ्या रोटरी संस्थेच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे नाशिककरांकडून स्वागत करण्यात येत आहे. रोटरी संस्थेचे अध्यक्ष प्रफुल बरडीया आणि सचिव ओमप्रकाश रावत यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम घेतला जातो आहे.

आणखी 7 रिक्षा दाखल होणार

पिंक रिक्षाच्या (Pink rickshaw) या उपक्रमासाठी रोटरी संस्थेमार्फत नाशिक शहरात आणखी पिंक रिक्षा देण्याचा अध्यक्ष प्रफुल बरडीया यांचा मनोदय आहे. यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती आर्थिक मदतीचा हातभार लावण्यासाठी पुढे येत आहेत. आणखी ६ ते ७ पिंक रिक्षा गरजू महिलांना द्यावयाच्या असून शहरातील ज्या गरजू महिलांनी रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण घेतलेले आहे, ज्यांच्याकडे आरटीओ परवाना तसेच प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, आधार कार्ड या कागदपत्रांसह कर्ज घेण्याची पात्रता आहे अशा खरोखर गरजू महिलांनी आपला अर्ज दि. २७ मे पर्यंत अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ नाशिक, गंजमाळ, नाशिक येथे भेटावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान आलेल्या अर्जांची पडताळणी आणि छाननी करून पात्र आणि गरजू महिलांची निवड विशेष समिती मार्फत करण्यात येणार आहे. गरजू महिलांनी रोटरी क्लबच्या सुधीर वाघ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा :

The post Pink rickshaw : नाशिककरांच्या सेवेत दोन 'पिंक रिक्षा' दाखल appeared first on पुढारी.