Powerat80 : खऱ्या अर्थाने जनतेचा राजा! वयाच्या ८० व्या वर्षी तरुणाला लाजवेल असे कार्य

नाशिक : अठरापगड जातीसाठी आणि विशेषतः देशातील शेतकऱ्यांसाठी पवारसाहेबांचे योगदान मोठे आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात तरुण घराबाहेर पडायला घाबरत होते; परंतु आपत्तीच्या परिस्थितीत पवारसाहेब घराबाहेर पडले आणि जनतेला दिलासा दिला. जिथे शेतकऱ्यांवर संकट आले असेल तिथे पवारसाहेब धावून गेले. वयाच्या ८० व्या वर्षी तरुणाला लाजवेल, असे काम पवारसाहेब करत आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणून ओळखले जाते. आजच्या युगात खऱ्या अर्थाने जनतेचा राजा शरदचंद्रजी पवारसाहेब आहेत, असे म्हटले तर वावगे होणार नाही. गेली सहा दशके महाराष्ट्रात नव्हे, तर देशपातळीवर समाजकारण व राजकारण करत असताना त्यांनी सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केले. -कोंडाजीमामा आव्हाड, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, नाशिक 

 

क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचा मी अध्यक्ष असताना अभियांत्रिकी महाविद्यालय इमारत उद्‌घाटन आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण पवारसाहेबांच्या हस्ते झाले. या वेळी प्रास्ताविकामध्ये मी संस्थेच्या कामकाजाविषयीचा उल्लेख केला होता. ते ऐकून पवारसाहेबांनी संस्थेला पन्नास लाख रुपयांची देणगी जाहीर केली. पंधरा दिवसांच्या आत विद्या प्रतिष्ठान आणि पवार चॅरिटेबल ट्रस्टकडून निधी मिळाला. संस्थेच्या इतिहासात एवढी मोठी देणगी पवारसाहेबांनी दिली. पवारसाहेबांचे ऋण मी विसरू शकत नाही. पवारसाहेब, प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटीलसाहेब, पालकमंत्री छगन भुजबळसाहेब यांनी माझ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली.

मी पवारसाहेबांचे राष्ट्रवादी विचार तळागाळातील सामान्यांपर्यंत पोचविण्याचे काम करत आहे. पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त १३ डिसेंबरपासून रक्तदान सप्ताह आयोजित केला आहे. पालकमंत्री भुजबळसाहेब आणि माजी खासदार समीरभाऊ भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन करण्याचा संकल्प आम्ही सोडला आहे. अशा या जाणत्या राजाला वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा!