Powerat80 : शरद पवार म्हणजे साखर उद्योगातील परीसस्पर्श! 

नाशिक :  अनेकदा साखर उद्योग अडचणीत असताना देश तसेच जागतिक पातळीवरसुद्धा साखर उद्योगातील समस्या सोडविण्यासाठी व  साखर उद्योगाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो नॅशनल फेडरेशन दिल्ली, व्हीएसआय व साखर संघाच्या माध्यमातून कायमच साखर उद्योग व साखर उद्योगात येणाऱ्या समस्या जसे की नवनवीन प्रकार त्यासाठी लागणारी खते, कीटकनाशके, जास्तीत जास्त रिकव्हरी देणाऱ्या उसाच्या जाती यांचा उपयोग करून शेतकरी, ऊसतोड मजूर, साखर कारखाना कामगार व साखर कारखानदारी कशी नफ्यात येईल, यासाठी कधी स्वतः, तर कधी संपर्क साधून अनेकदा उपाय व सुधारणा करण्यासाठी सूचना दिल्या जातात. कारखान्यांची बँक प्रकरणे अडचणीत असतील, तर अनेक बारीकसारीक गोष्टींमध्ये तोडगा काढून केवळ फायनान्समुळे बंद असलेल्या साखर कारखान्यांना कशी मदत करता येईल, यासाठी पीएमओ कार्यालय असो वा संबंधित खात्याचे मंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्यासंदर्भात यांचा हातखंडा मोठा आहे.

माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व वसंतदादा पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवत शरद पवारसाहेबांनी साखर उद्योगाला अन्‌ देशाला प्रगतीचा मंत्र दिला आहे. - श्रीराम शेटे, उपाध्यक्ष, साखर संघ, अध्यक्ष, कादवा सहकारी साखर कारखाना 

मध्यंतरीच्या काळात स्वतः पवारसाहेबांनी पंतप्रधानांना ‘व्हीएसआय’ला नेत साखर उद्योगासंदर्भात असलेल्या समस्या, साखरनिर्मितीत असलेल्या अडचणी समजून सांगत अनेक अडचणी कायमच्या संपून टाकल्या.  साखर कारखाने जास्तीत जास्त दिवस चालवण्यासाठी उसाबरोबरच बिटाचे गाळप कसे करता येईल, यासाठी शिष्टमंडळासह पाहणी करून त्यासंदर्भात पावले उचलली जात आहेत. शेतकरी, मजूर व कारखाना जगविण्यासाठी त्यांची असलेली धडपड वाखणण्याजोगी आहे. मध्यंतरीच्या काळात सरकारची वीजसंदर्भातील समस्या कमी करण्यासाठी कारखान्यांना वीज प्रकल्पाच्या माध्यमातून एक बायप्रॉडक्ट निर्माण करून दिले. यामुळे अनेक कारखान्यांना त्याचा चांगला फायदा झाला.  दिवसागणिक इतर पिकांची अवस्था शाश्वत उत्पन्न देत नसल्याने भविष्यात उसाचे क्षेत्र वाढत असल्याने साखर उत्पादनही वाढत आहे. यामुळे पडणारे साखरेचे भाव कमी होतील, यावर मार्ग काढण्यासाठी पवारसाहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन व्हीएसआय व साखर संघ यांची बैठक घेऊन यापुढे इथेनॉल तयार केल्याशिवाय उसाला चांगला चांगला भाव देता येणार नाही, यासाठी साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीकडे वळण्याच्या सूचना करून देशातून बाहेर जाणारे चलन शेतकरी सभासदांचे खिशात कसे पडेल, या साथीच्या सूचना केल्याने व इथेनॉलचे चांगले धोरण तयार करून दिल्याने आज अनेक साखर कारखाने इथेनॉलकडे वळून भविष्यात काही प्रमाणात का होईना इंधन देशात तयार होऊन त्याचा फायदा साखर उद्योग पर्यायाने सभासद व या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या करोडो व्यक्तींना होईल.

 

आज साखरेसंदर्भाच्या कोणत्याही समस्या असो मग त्या देश किंवा राज्यपातळीवर असल्या तरी पवारसाहेबांना पुढाकार घेऊन त्याची सोडवणूक करण्यासाठी केंद्र व राज्य यांच्या मागे लागून ती पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. शासनाने लागू केलेल्या एफआरपीपेक्षा ज्यादा भाव काही साखर कारखान्यांनी दिल्याने हा कारखान्यांचा नफा आहे, असे तर्क बांधत इन्कमटॅक्स लावला. हा टॅक्स वाचविण्यासाठी साखर संघ व साखर कारखान्यांच्या सयुक्तिक बैठक घेऊन त्या विरोधात सुप्रीम कोर्टाकडे याचिका दाखल केली आहे. कारण हा टॅक्स भरावयाचा झाल्यास अनेक साखर कारखान्यांना आपली मालमत्ता विकून नाही ती पूर्ण होणार नाही, असा प्रचंड हा टॅक्स असल्याने याबाबतही पवारसाहेबांनी मध्यस्थाची मोठी भूमिका पार पाडली आहे. आज केवळ साखर उद्योगामुळे शासनाला अब्जावधी रुपयांचा कर व करोडो लोकांना रोजगार या इंडस्ट्रीमुळे मिळत असल्याने देशाच्या विकासाला हातभार लावणारा हा साखर उद्योग टिकविण्यासाठी पवारसाहेब डोळ्यात तेल घालून अत्यंत अभ्यासूपणाने लक्ष ठेवून आहेत,

 

यासाठी अनेक बंद पडलेली कारखाने पुन्हा कशी सुरू होतील यासाठी बँका, सभासद, कामगार यांच्या बैठका घेऊन व सरकारच्या मदतीने जी काही मदत करणे शक्य आहे, त्यासाठी पाठपुरावा करून बंद असलेले साखर कारखाने सुरू करण्यासाठी त्यांचे प्रामाणिक प्रयत्न बघता पवारसाहेबांसारखे नेतृत्व आपलं नशीब असून, त्याची इच्छाशक्ती व कार्य भल्याभल्यांना लाजवणारे आहे. अशा या महान नेतृत्वाला आजच्या जन्मदिनी माझ्या कादवा सहकारी साखर कारखान्याचे सभासद संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, ऊसतोड मजूर व कादवा परिवार यांच्याकडून जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा