Powerat80 : शेतकरी डोळ्यासमोर ठेवून अहोरात्र झटणारा नेता..!

 

आमचे नेते शरदचंद्रजी पवार या व्यक्तिमत्त्वाबद्दल देशातील प्रत्येकाच्याच मनात कुतूहल आहे. कारण ते ज्या जिल्ह्यात जातील येथील कार्यकर्त्यांना नावानिशी ओळखणारे ते एकमेव राजकीय व्यक्ती आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडे मोठा लोकसंग्रह आहे. अनेक राजकीय पक्षांतील नेतेमंडळी पवारसाहेबांवर पक्षीय भेद म्हणून टीका करत असतील, मात्र एक माणूस म्हणून सर्वच पक्षांतील नेतेमंडळी पवारसाहेबांवर नितांत प्रेम करतात हे निर्विवाद सत्य नाकारता येत नाही. येवल्यासारख्या सतत दुष्काळी असणाऱ्या तालुक्यात छगनराव भुजबळ यांना अनुभवामुळे प्रतिनिधित्व देऊन, तालुक्याच्या विकासासाठी मोठे कार्य केले आहे. कृषी, राजकारण, समाजकारण, अर्थकारण इथपासून ते क्रिकेटच्या मैदानापर्यंत साहेबांचा बोलबाला आहे. -अंबादास बनकर, माजी अध्यक्ष, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 

 

शरद पवारसाहेब यांना समाजकारणात विशेष रस आहे. हे त्यांनी वारंवार दाखवून दिले आहे. त्यांनी त्या दृष्टीने अनेक पुरोगामी पावले उचलली आहेत. सर्व समाजांच्या लोकांना बरोबर घेऊन चालण्यात त्यांचा हात कुणीही धरू शकत नाही. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शरदचंद्र पवार हे नाव सुमारे ५० वर्षांपासून सतत गाजतेय. जनता पक्षाच्या मदतीने त्यांनी सरकार स्थापले आणि देशातले ते सर्वांत तरुण मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून जनमानसावर शरद पवार नावाचे गारुड स्वार आहे. राज्यात गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना पहाटे लातूरला भूकंप झाला. त्या वेळी भूकंपानंतर काही वेळातच पवारसाहेब घटनास्थळी उपस्थित झाले अन्‌ मदतीची कार्यवाही सुरू झाली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत करणारे एकमेव नेते शरदचंद्र पवारसाहेब आहेत. शेतकऱ्याची परिस्थिती सुधारली तरच देशाचीही परिस्थिती सुधारेल, ही दूरदृष्टी असणारे नेते पवारसाहेबच आहेत. त्यांच्या सरकारमध्ये काँग्रेसवासी सुशीलकुमार शिंदे हेही होते. प्रशासनाचा अजिबात अनुभव नसलेले सदानंद वर्दे यांच्यासारखे जनता पक्षाचे नेतेही होते. ही कसरत सांभाळताना पवार यांची उत्तम प्रशासक अशी ख्याती झाली, ती ख्याती आज वयाची ८० वर्षे पार करतानाही टिकून आहे.

सर्वसमावेशक पालक शरदचंद्र पवार 

पवार यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, एरवी संधिसाधू म्हणणारी बुद्धिवादी मंडळी पवारसाहेबांना आशीर्वाद देण्यात आघाडीवर असतात, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. देशातील शेतकरी डोळ्यासमोर ठेवून पवारसाहेब शेतकरीहिताची धोरणे राबवितात. त्यामुळेच पवारसाहेबांचे कौशल्य तेव्हापासून देशवासीयांच्या डोळ्यात भरले आहे. देशात महाराष्ट्र हे एक असे राज्य आहे, जेथे महिला धोरण प्रथम जाहीर केले, तेही पवारसाहेबांनीच! राज्यातील महिलांना अनेक फायदे देणारे हे धोरण नंतर इतर अनेक राज्यांनी स्वीकारले. पवारसाहेबांनी राज्यातील फलोत्पादनाला चालना देणारे धोरणही जाहीर केले. द्राक्ष, बोरे, डाळिंबे इत्यादी फळांचे उत्पादन महाराष्ट्रात वाढले ते पवारसाहेबांनी राबविलेल्या धोरणानंतरच. द्राक्षापासून वाइन बनवून शेतकरी अधिक पैसे मिळवू शकतो, हेही पवारांनी सांगितले. ज्यांनी तसे शास्त्रशुद्ध पद्धतीने केले त्यांना पैसाही मिळाला. याचा फायदा छोट्या शेतकऱ्यांनाही झाला. पवारांनी शेती आणि दूध उत्पादन या क्षेत्रात बारामतीत केलेले प्रयोग आजही वाखाणले जातात. सर्वांनी त्यांचे अनुकरण करावे, असे ते आहेत. किंबहुना पवारसाहेब शेती, उद्योग यात रमतात. तो त्यांचा पिंड आहे.

 

या देशात पिकणारी द्राक्षे व इतर फळे इतर देशांत निर्यात केल्यास त्या देशातून पिकावर औषधांचा जास्त मारा केल्याचे कारण देत माल नाकारला गेल्यावर पवारसाहेबच मार्ग काढतात. यावर देशातील शेतकऱ्यांचा पूर्ण विश्वास आहे. गेल्या चार महिन्यांपासून शेतकरीहितासाठी पवारसाहेब केंद्राशी झगडत आहेत. आज राज्यातील कांदा नीचांकी भावाने विकावा लागत आहे. यावर पवारसाहेब कांदा निर्यात खुली करावी यासाठी राष्ट्रपतींच्या भेटीलाही गेले. शेतकऱ्यांप्रति प्रचंड तळमळ असणारे नेते म्हणजे शरदचंद्र पवारसाहेबच आहेत. पवार महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय आहेत. राजकीय अपरिहार्यता म्हणून पवारांना काही निर्णय घ्यावे लागतात. मात्र कोणताही निर्णय घेताना त्यात शेतकरीहित दिसते. 

पवार यांचे विचार नेहमीच पुरोगामी ठरले आहेत. पवार यांनी अनेकदा, स्वत:चे नाव येऊ न देता इतरांना मदत केली आहे. जयंत नारळीकरांचे आकाशाशी जडले नाते, या खगोलशास्त्रविषयक अप्रतिम पुस्तकाच्या ५०० प्रती मुंबई, पुणे शहराबाहेरील गरीब शाळांतून वाटल्या. त्या अशाच निनावी पद्धतीने. ग्रामीण भागात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना, संस्थांना त्यांचा नेहमीच आधार वाटतो. साहित्य, कलाकार यांनाही त्यांनी अशीच मदत केली आहे. 
पवार यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी विविध क्षेत्रांतील जोडलेली माणसे. वैद्यकशास्त्र, लेखन, अभिनय, चित्रनाट्य, समाजकारण, उद्योग अशा क्षेत्रातील अनेक जण पवारांचे स्नेही आहेत. या सर्वांना पवारांनी मदतही केली आहे. पवारसाहेब उत्तम वाचक आहेत. बारामती येथे उभारलेल्या शिक्षणसंस्थेत त्यांनी खरेदी केलेली, वाचलेली पुस्तके, ग्रंथ वाचकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी ठेवलेली आहेत. त्यावरून एक नजर टाकली तरी पवारांना किती विविध विषयांत रस आहे, हे जाणवते. राजकारणात असलो तरी मित्र सर्वच क्षेत्रांतील असावेत, हा धडा बहुधा ते आपले गुरू यशवंतराव चव्हाण यांच्याकडून शिकले असावेत. अशा या सागराएवढ्या नेत्यास दीर्घायुरारोग्य लाभावे, या शुभेच्छा!