Powerat80 : समाजमनाची नाडी कळलेले जाणते नेते शरद पवार..!

नाशिक : पिंपळगाव बाजार समितीने अद्ययावत उभारलेल्या शंभर जागेतील सुपर मार्केटला ‘शरदचंद्र पवार बाजार समिती’ असे नामकरण करून त्यांच्या सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा अल्पसा प्रयत्न केला. सहकार क्षेत्रातील माझे ममत्व पाहून साहेबांनी सलग पाचवेळा विधानसभा निवडणुकीसाठी निफाड मतदारसंघातून मला राष्ट्रवादीची उमेदवारी दिली. दुसऱ्यांदा विधानसभेचा सदस्य झालो, ते पवारसाहेब यांच्या आशीर्वादामुळेच..!

समाजमनाची नाडी कळलेले जाणते नेते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज देशात सर्वदूर ओळखले जातात. सुसंस्कृतपणे राजकारण, समाजकारणात नाममुद्रा उमटविताना सहकारी संस्थांमधून सामान्य व्यक्तीच्या उत्कर्षासाठी त्यांचे योगदान कायमचे कोरले गेले आहे. महाराष्ट्रात साखर कारखाने, सहकारी आर्थिक संस्थांची पाळेमुळे रुजविण्यात पवारसाहेबांचे धोरण व दूरदृष्टी आहे. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पवारसाहेबांनी सहकारातून बळ देत दुसऱ्यांदा विधानसभेत निफाड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. फुले- शाहू- आंबेडकरी विचारांचा वारसा व आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श ठेवत वाटचाल करताना पवारसाहेबांचा ८० व्या वर्षीही महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात त्यांच्या नेतृत्वाचा दबदबा कायम आहे. - दिलीप बनकर, आमदार, निफाड विधानसभा मतदारसंघ 

 

नेतृत्व व कर्तृत्व अशा दोन्ही गुणांचा संगम पवारसाहेब यांच्यात असल्याने पंचवीस वर्षांपूर्वी त्यांच्या विचारांशी जोडला गेलो. जून १९९९ मध्ये राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सदस्यत्व स्वीकारत नाळ अधिकच घट्ट झाली. सहकारी चळवळीतून जनसामान्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने पिंपळगावला (स्व.) अशोकराव बनकर पतसंस्थेची स्थापना केली. जानेवारी २००२ मध्ये पवारसाहेब यांनी अद्ययावत वास्तूचे उद्‌घाटन केले. संस्थेचे कामकाज व इमारत पाहून साहेबांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. भविष्यात तुला खूप मोठी जबाबदारी पेलायची आहे, हे त्यांचे वाक्य आजही मला आठवते. पिंपळगावचा उद्‌घाटन सोहळा आटोपून मालेगावच्या जाहीर कार्यक्रमात सहकारी संस्था बनकर यांच्यासारखी असावी, असे कौतुकोद्गार त्यांनी काढले, ते अधिक प्रेरणादायी ठरले. 

पिंपळगाव बाजार समितीने अद्ययावत उभारलेल्या शंभर जागेतील सुपर मार्केटला ‘शरदचंद्र पवार बाजार समिती’ असे नामकरण करून त्यांच्या सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा अल्पसा प्रयत्न केला. सहकार क्षेत्रातील माझे ममत्व पाहून साहेबांनी सलग पाचवेळा विधानसभा निवडणुकीसाठी निफाड मतदारसंघातून मला राष्ट्रवादीची उमेदवारी दिली. दुसऱ्यांदा विधानसभेचा सदस्य झालो, ते पवारसाहेब यांच्या आशीर्वादामुळेच..! अपयशातही त्यांनी मला लढण्याचे बळ दिलं. 
सहकार चळवळ हा पवारसाहेबांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आर्थिक विकास व समाज परिवर्तन या सहकाराच्या दोन बाजू, तर आर्थिक सुबत्ता हे तिचे मुख्य उद्दिष्ट आहे, हे पवारसाहेबांनी ओळखले. सहकार चळवळ भक्कम होण्यासाठी तसे धोरण राबवले. त्यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात समृद्धी पाहायला मिळाली. महाराष्ट्राला संबंध देशात साखर आणि फलोत्पादनाच्या बाबतीत जे वेगळेपण प्राप्त झाले, ते सहकारी चळवळीमुळेच. सहकारी चळवळ ही एखाद्या राजकीय पक्षाची वा संघटनेची चळवळ नाही. सर्व समाज घटक, सामान्य व शोषित लोकांच्या उपयोगी पडणे, हेच सहकार चळवळीचे प्राणतत्त्व आहे. पवारसाहेबांनी या चळवळीला वैचारिक दिशा दिली. सहकारी चळवळीचा जन्म मुळात दुर्बल व्यक्ती व समाजघटकांना आधार देण्यासाठी झाला आहे, याची पुरेपूर जाणीव पवारसाहेब यांना आहे. 

महाराष्ट्राच्या लोकमनावर प्रभाव टाकणारे यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर शरद पवार हे एकमेव द्वितीय नेते आहेत. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी सहकारातून प्रयत्न व सर्व प्रदेशाच्या समतोल विकासाची दृष्टी त्यांनी ठेवली. राजकीय द्रष्टे राजकीय नेतृत्व त्यांच्या वाटचालीत दिसते. सहकाराबरोबरच राजाच्या कृषी व औद्योगिक धोरणांची आखणी त्यांनी केली. शेतकऱ्यांवर त्यांचे किती निस्सिम प्रेम आहे, हे ते देशाचे कृषिमंत्री असताना राबविलेल्या धोरणातून स्पष्ट होते. त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा विचार करता पवारसाहेब गेली साडेपाच दशकं राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांचे सुसंस्कृत नेतृत्व राज्यातील कष्टकरी वंचित, कृषक समूहाला कायमच आपले वाटते. सत्ता असो नसो त्यांचा भोवतीचा गर्दीचा गहिवर कधी कमी झाला नाही. 

सत्तास्थानी किती काळ राहिले, यापेक्षा सत्तास्थानी राहून लोकाभिमुख राज्य कारभार कसा करावा, याचा आदर्श त्यांनी पुढील पिढीसमोर ठेवला. सत्ता गेल्यानंतरही ज्यांची लोकप्रियता थोडीही कमी होत नाही, असे लोकोत्तर नेतृत्व पवारसाहेब यांचे असून, त्यांच्यात मला युगप्रवर्तक दिसतो. 
वयाच्या ३८ व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषवून महाराष्ट्राच्या जनतेशी आपलेपणाचा धागा जोडला. स्वत:विषयी जनतेत विश्‍वास निर्माण केला. तीच त्यांची प्रचंड शक्ती ठरली. या शक्तीमुळेच राजकारणात पुढे ‘पवार आणि पॉवर’ हे दोन शब्द समानार्थी रूढ झाले. कुटुंबातून वारशात मिळालेला सत्यशोधकीय विचार नुसता जपला नाही, तर राजकीय, सामाजिक कृतीतून तो दाखवून दिला. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असा नामविस्तार करून त्यांची प्रचीती त्यांनी दाखविली. त्याची मोठी राजकीय किंमत चुकवून त्यांनी समतेच्या बाजूने आपण आहोत, हे दाखवून दिले. 
आजच्या घडीला सहकार व शेती-मातीशी नाळ असणारे देशपातळीवरील एकमेव राजकीय नेतृत्व म्हणून पवार यांच्याकडे पाहिले जाते. शेतकऱ्यांच्या सुख-दुःखाची आणि भवितव्याची सतत काळजी वाहणारे शरद पवार या वयातही बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे दुःख ऐकतात. 

शरद पवार नावात काय ताकद आहे, हे २०१९ च्या निवडणुकीच्या निमित्ताने तरुण पिढीने अनुभवले. सगळं संपलं, असे जेव्हा वाटते, तेव्हा शरद पवारांसारखा लढायला शिका, हे वाक्य देशांच्या तरुणांचे ब्रीदवाक्य ठरले आहे. बलाढ्य शक्तीला हिंमत, स्वाभिमान आणि कौशल्याच्या जोरावर मात देता येते, याचा वस्तुपाठ यानिमित्ताने त्यांनी महाराष्ट्रासह देशासमोर ठेवला. अफाट कार्यक्षमता, स्मरणशक्ती, सामाजिक भान, दुर्दम्य इच्छाशक्ती हे शब्द पवार यांना समानार्थी वापरले जातात. जनतेनेही त्यांच्यावर अवीट प्रेम केले. जनतेचे प्रचंड प्रेम लाभलेल्या या लोकनेत्याला उदंड आयुष्य लाभो, याच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा..! 

(शब्दांकन : एस. डी. आहिरे, पिंपळगाव बसवंत)